दोन महिन्यानंतर चावलेला कुत्रा कसा शोधणार साहेब; गोंदिया पोलिसचा अजब फतवा!


गोंदिया, दिनांक : १३ फेब्रुवारी २०२३ : गोंदिया पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला कुत्रा चावला. गंभीर जखम बघता डॉक्टरांनी त्याला उपचार आणि आरामाचा सल्ला दिला. परिणामी या पोलिसाने विशेष रजेसाठी अर्ज केला. त्याच्या अर्जाला जिल्हा पोलीस कार्यालय अधीक्षकांनी काहीसे रंजक उत्तर दिले. कर्तव्यावर असताना राज्य शासनातील एखाद्या कर्मचाऱ्याला पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला असेल तर त्याला उपचारासाठी विशेष रजा देय ( मंजूर ) आहे. मात्र, तुम्हाला चावलेला कुत्रा पिसाळला होता की नाही, ते या विनंती अर्जातून स्पष्ट होत नाही. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र ( पिसाळलेला कुत्रा चावल्याचे ) सोबत जोडलेले नाही’, असे म्हणत अर्ज कार्यालय अधीक्षकांनी परत केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याला कुत्रा चावल्यानंतर त्यांनी उपचारासाठी सुट्टी हवी म्हणून अर्ज केला. तसेच उपचारही घेतले. त्यानंतर जखमा भरल्यानंतर कर्तव्यावर रुजूही झाला. आता तब्बल दोन महिन्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला वरील पत्र मिळालं असल्याने आता दोन महिन्यानंतर चावलेला कुत्रा कसा शोधणार असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यासमोर पडला आहे. मात्र सोशल मीडियावर हा पत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांबद्दल गंमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

एका पोलीस कर्मचाऱ्याला कार्यालयीन अधीक्षकाने सुट्टीच्या संबंधाने नुकतेच तसे पत्र दिले असून, त्या पत्राची प्रत व्हायरल झाली आहे. तर यासंदर्भात गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी लिहिताना संबंधित क्लर्ककडून चूक झाल्याचं मिडिया प्रतिनिधीना सांगितलं तर पोलीस शिपाई यांच्या सुट्टीच्या अर्जाला दोन महिन्यानंतर उत्तर का मिळाले असे विचारले असता दीड ते दोन महिने या प्रोसेसला लागतात असं सांगण्यात आलं.


 

Leave a Comment