गोरेगांव, गोंदिया, दिनांक : १३ फेब्रुवारी २०२३ : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विविध बाबींची माहिती होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गोरेगांव येथील जगत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक शिबिर बबई या ठिकाणी घेण्यात आल. या शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रीती कतलाम जि.प. सदस्य, वंशिला उईके सरपंच बबई, राजेश बिसेन उपसरपंच बबई, नरेंद्र पटले, भुमेश्वरी बघेले, अनुसया राऊत, उर्मिला बोपचे, देवांगणा उईके, सोमेश रहांगडाले रा.का. प्रवक्ता, शाळेचे मुख्याध्यापक बागडकर, डॉ. निलकंठ लंजे प्राचार्य जगत महाविद्यालय, डॉ. एस. एस. भैरम प्राचार्य जगत महाविद्यालय गोरेगाव, डॉ. जे.बी. बघेले, डॉ. व्ही यु रहांगडाले, शेखर गुजर शा. व्य. स. बबई, छेदीलाल कोकोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलकंठ लंजे यांनी केले.
शिबिराच्या उदघाटक आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी बोलताना म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना बंधनकारक करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळापासून लोक आपले स्वतःचे आरोग्य स्वतः सांभाळत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेत आज विशेष प्रबोधन करणे आता सोपे झाले असल्याचे सांगितले. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वेगवेगळ्या उपक्रमाचा आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी फायदा करून घेण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामीण भागातील संस्कृती ही मानवाला पुढे घेऊन जाणारी आहे. बबई हे गाव खूप सुंदर आहे. या गावांमध्ये तुम्ही कॅम्प घेत आहात याबद्दल तुमचे अभिनंदन केले पाहिजे असे मत व्यक्त केले. या वेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासात महाविद्यालयाला भरपूर काही करण्यासारखे आहे.
जगत महाविद्यालयातील विद्यार्थी निश्चितच त्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करतील असा मला आत्मविश्वास असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. निलकंठ लंजे यांनी महाविद्यालय ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी इथल्या ग्रामीण लोकांशी एकरूप होऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या शिक्षणाच्या माध्यमातून व अन्य माध्यमातून कशा पद्धतीने सोडवता येतील यावर विचार मंथन करून उपाययोजना व काही प्रभावी उपाय करता येतात का यावर विचार करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. आभार प्राचार्य एस एच भैरम यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.