प्रफुल्ल पटेलांवर इडी कडून मोठी कारवाई!

संग्रहित छायाचित्र


मुंबई वृत्तसेवा, दिंनाक : १० फेब्रुवारी २०२३ : ईडीकडून काही दिवसांपूर्वी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व नातेवाईकांच्या घरी ईडीने छापे टाकले होते.

तसेच मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेतही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. आता ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा धक्का देत शरद पवारां चे अत्यंत विश्वासू समजले जाणाऱ्या प्रफुल्ल पटेलांवर मोठी कारवाई केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजले ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने याबाबत माहिती दिली आहे. सील करण्याची कारवाई मागील वर्षीच करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया आता पूर्ण झाली ईडी च्या या कारवाईनंतर आता पटेल कुटुंबाला हे चारही मजले रिकामे करावे लागणार आहेत.

कुख्यात तस्कर व गँगस्टर इक्बाल मिर्ची आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं याच इमारतीतील इतर दोन मजलेही सील केले आहेत. हे दोन मजले इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक,हसन मुश्रीफ यांच्यानंतर ईडीच्या रडारवर प्रफुल्ल पटेल आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकऱणात मलिक यांचे नाव कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले होते. त्यानंतर आता पटेल यांचे नाव दाऊदशी जोडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी( दि.८) दुपारी ईडीचे अधिकारी वरळी येथील सीजे हाऊस याठिकाणी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी चौथा मजला सील केला.

प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपनीनं सीजे हाऊस इमारत बांधण्यात आली होती. याच भूखंडावर कुख्यात तस्कर व गँगस्टर इक्बाल मिर्ची यांच्या मालकीची काही मालमत्ता होती. इमारत उभी राहिल्यानंतर त्यात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना दोन मजले देण्यात आले होते. हे मजलेही ईडीनं मागील वर्षी सील केले आहेत.

याच प्रकरणात डीएचएफएलचे वाधवान बंधू कपिल आणि धीरज यांची चौकशी झाली असून कपिल वाधवान अटकेत आहे, तर धीरज वाधवान जामिनावर आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात पटेल यांची १२ तासांहून अधिक चौकशी करण्यात आली होती.


 

Leave a Comment