देवरी, गोंदिया, दिनांक – ०७ जुलै २०२२ – देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या ककाडो चिचगड मार्गावर 28 जून रोजी अज्ञात इसमांनी बंदुकीच्या धाकावर दारुव्यवसायिकाकडून 5 लाख रुपये लुटून फरार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ककोडी-चिचगडच्या दरम्यानच्या वडेकसा जंगलपरिसरात सायकांळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. ककोडी येथील देवराज गुण्णेवार (अण्णा) हे देशी दारू दुकान किरायाने चालवत असून ते दारु दुकानातील हिशोबाचे पैसे घेऊन देवरीकडे आपल्या चारचाकी वाहनाने निघाले असताना अज्ञात दरोडेखोरांनी गुण्णेवार यांच्या गाडीला ओवरटेक करीत गाडी थांबवली.
गाडी थांबवताच दरोडेखोरांनी गुण्णेवार व वाहनचालकावर बंदुक रोखून पैशाची मागणी करीत पैसे न दिल्यावर जिवे मारण्याची धमकी देताच पैशाची बँग दरोडेखाेराच्या हातात दिली. पैशाची बँग मिळताच दरोडेखोरांनी गुण्णेवार यांच्या गाडीची चाबी सोबत घेत आलेल्या वाहनाने छत्तीसगड मार्गाने पोबारा केला. या घटनेचा तपास चिचगड पोलीस करीत असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.