धानाच्या पुजन्यासह ट्रॅक्टर व मळणी यंत्र जळून खाक 


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक 16 –  तालुक्यातील खडकी बाम्हणी येथील शेत शिवारात पाच एकर धानाचे पुंजने ट्रॅक्टर व मळणी यंत्रासह १६ नोव्हेंबर ला ११ वाजेदरम्यान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शामराव भेंडारकर खडकी बाम्हणी असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव असून शालीकराम हरी पटने राजगुडा मोगरा असे नुकसानग्रस्त ट्रॅक्टर व मळणी यंत्र मालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार तालुक्याच्या ठिकाणावरून १० किमी. अंतरावरील खडकी बाम्हणी राष्ट्रीय महामार्गाला लागून असून दक्षिण दिशेला ३०० मी. वर शामराव भेंडारकर या शेतकऱ्यांचे मालकीचे शेत आहे. शामराव भेंडारकर यांनी धान कापणी करून तीन पुंजने तयार करून ठेवले. १६ नोव्हेंबर ला सकाळच्या सुमारास धान मळणीला सुरुवात केली. पण काही वेळातच ट्रॅक्टरने अचानक पेट घेतल्याने ट्रॅक्टर जळून खाक झाले व मळणी यंत्र ६५ टक्के जळले. यात शालीकराम हरी पटने राजगुडा मोगरा यांचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले.

तर शामराव भेंडारकर यांचे धान पुंजने जळाल्याने दिड लाखाचे नुकसान झाले. धानाची मळणी करतांना धानाचे पुंजने ट्रॅक्टर व मळणी यंत्र जळून खाक झाल्याने ट्रॅक्टर मालकाचे व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतक-याचे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी व ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र मालक यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


 

Leave a Comment