सौंदड/ सुंदरी रस्त्याची दयनीय अवस्था, डांबर मार्गावर तलावाचे दर्शन ?

गोंदिया, सडक अर्जुनी, सौन्दड, दिनांक – 07 ऑगस्ट 2021 – ( भामा चुर्हे ) – गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा सौंदड-सुंदरी-चारगाव फाटा-परसोडी या रस्त्याची मागिल सात वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांची सिमा सौंदड बाजारचौकावरून अंदाजे ८०० मी. अंतरावर आहे सन २०१६-१७ मध्ये या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते.

कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने एकाच वर्षात रस्त्याला अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. नंतर सन २०१८-१९ मध्ये पुन्हा या रस्त्याला पॅचेशचे काम करून डांबरीकरणाचे कोड लावण्यात आले. पण पहिल्या पावसातच रस्त्याची स्थिती जैसे थे झाली.

सदर रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाच-पाच लाख मंजूर केले होते. कंत्राटदार हे पालकमंत्र्यांच्या जवळचे कार्यकर्ते असल्याने थातुरमातुर काम करुन पैशाची उचल केल्याचे बोलले जाते. सौंदड हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून या गावावरून रेल्वे स्टेशन व राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना जाणे-येणे साठी सदर रस्ता सोईस्कर होतो.

या रस्त्याने रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. सौंदड गाव मोठे असून परिसरातील लोकांना बॅंक, दवाखाना,बाजार, शाळा महाविद्यालय व इतर कामांसाठी ये-जा करावी लागते. मागिल तीन वर्षांपासून पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहत असते. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.

अनेक दुचाकी स्वारांचे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्यावर वाहतूक करतांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ही आता रोजचीच बाब झाली आहे. सौंदड हे गाव मुख्य बाजारपेठ असल्याने सुंदरी, चारगाव, परसोडी, पोवारटोली, लवारी, उमरी येथील नागरिक शेतीला लागणारे साहित्य, औषधी नेण्यासाठी ये-जा करीत असतात.

मागिल सात वर्षांत सौंदड वरून भंडारा जिल्ह्याची सिमा ८०० मी. नंतर सुंदरी, परसोडी, चारगाव या गावांना जाणा-या २ ते ४ किमी अंतरावर एकही खड्डा मिळणार नाही. या रस्त्याने भंडारा जिल्ह्यातील जाणारे नागरिक गोंदिया जिल्ह्यातील रस्त्याची दयनीय अवस्था पाहून येथील लोकप्रतिनिधी आंधळे आहेत की काय ? असा प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे सदर रस्त्याला आमदारांनी दत्तक घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


 

Leave a Comment