गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 07 ऑगस्ट 2021 – कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं तीच मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. नेहमी कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातूनच चांगला अनुभव मिळतो. हे सर्व केवळ अभ्यासामुळेच शक्य आहे. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा असे गौरवोद्गार श्री रमेशजी चुऱ्हे माजी जिल्हा परिषद सदस्य सौन्दड यांनी व्यक्त केले.
ते जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सौन्दड येथील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होते.
नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी चा निकाल जाहीर करण्यात आला. या वर्षी कोरोना चे संकट असल्याने प्रत्येक्ष जरी परीक्षा झाल्या नसल्या तरी अंतर्गत मूल्यमापन करून गुणदान करण्यात आले.
या वर्षी शासनाच्या आदेशानुसार इयत्ता १० वी तील गुण, इयत्ता ११ वी तील गुण व इयत्ता १२ वी तील अंतर्गत मूल्यमापन , प्रात्यक्षिक परीक्षा, विविध प्रकारच्या चाचण्या इत्यादी तंत्राचा वापर करून निकाल तयार करण्यात आला. विद्यालयात या वर्षी ४१ विद्यार्थी होते त्यापैकी २६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
विशेष म्हणजे या विद्यालयाची इयत्ता १२ वी ही पहिलीच तुकडी आहे. यात लीना डोंगरवार ९४%,मोनिका दोनोडे ९३%,निशा राऊत ९३%,कल्याणी मेश्राम ९२%,उर्वशी जनबंधू ९२%,मृणाली इरले ९२%,शुभांगी मदनकर 91%,चित्रगंधा इरले ९१%,डिलेश मेश्राम ९०%,विक्की वैद्य ९०% गुण घेत घवघवीत यश संपादन करून विद्यालयाचे नाव उज्वल केले.
याप्रसंगी श्री गंगाधरजी मारवाडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे तर उचित ध्येयाच्या उद्धिष्टपूर्ती कडे होणारी वाटचाल म्हणजे यश होय असे सांगितले.
आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळाल आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख होय. त्याचप्रमाणे जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असें नसते, एखादी गोष्ट पूर्वी पेक्षा चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय, असे सांगितले. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य सुनील भीमटे, शिक्षक वृंद अनिल बोरकर, जयपाल मोटघरे, अनिल कापगते, स्वदीप रामटेके, लोकेश रहांगडाले, प्रा.डॉ.मुकेश मेंढे, प्रा.प्रशांत बन्सोड, प्रा.अंजली शेंडे, प्रा.व्ही.एस. जांभुळे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी मोहन कोहळे व लताबाई पातोडे यांनी विशेष सहकार्य केले.