लाचखोर! ट्राफिक पोलीस हवालदार अडकला एसीबी च्या जाळ्यात


धुळे, दिनांक : ०४ मे २०२३ : ऑनलाईन दंड नको असेल तर स्वतःसाठी २०० रुपयाची मागणी करणारा ट्राफिक पोलीस हवालदार लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याला लाच घेतांना एसीबीने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. उमेश दिनकर सूर्यवंशी ( ४७ ) रा. पोलीस मुख्यालय बिल्डिंग क्र ३१ रुम नंबर २ धुळे हे लाच घेणा-या पोलिस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे.

या बाबत कारवाई बाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे कामानिमित्त चाळीसगाव येथून मोटरसायकलने येणे जाणे करतात, ट्राफिक पोलीस हे तक्रारदार यांना नेहमी धुळे शहरातील तहसील चौक, उर्दु शाळा येथे अडवून त्यांच्या कडे मोटरसायकलचे सर्व संबंधित कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना असतांना सुद्धा त्यांच्याकडे २०० ते ५०० रुपये ची मागणी करतात. पैसे दिले नाही तर ट्राफिक पोलीस जाऊ न देता मोठ्या रक्कमेचा ऑनलाईन दंड देण्याचे धमकावतात.

पोलिसांच्या नेहमीच्या पैसे वसुलीच्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी २ मे रोजी ला.प्र. वि. धुळे येथे तक्रार दिली होती. त्यावरून आज दिनांक ३ मे रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष ३ पडताळणी केली असता यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी यांनी तक्रारदार यांचे कडे ऑनलाईन दंड नको असेल तर स्वतःसाठी २०० रुपये ची मागणी करून सदर रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. सदर सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी केली आहे. सहा. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक, प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तर सापळा पथकात राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रोहिणी पवार हे होते.


 

Leave a Comment

और पढ़ें