- महिला सक्षमीकरणाचा संदेश देत आली सीआरपीएफची बाईक रॅली
भंडारा, दि. २१ : महिला सक्षमीकरणाचा सबळ संदेश घेऊन आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजे सीआरपीएफच्या 100 महिला बायकरचे जिल्हयात २० मार्च रोजी जोशात स्वागत झाले. महर्षी विदया मंदीर शाळेत या रॅलीचे स्वागत करण्यात आले. देशप्रेमाच्या घोषणांनी उपस्थित विदयार्थी नागरिकांनी या बाईक रॅलीचे स्वागत केले. पोलीस ग्रांउड येथे सीआरपीएफचे डीआयजी प्रशांत जांभुळकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह पोलीस अधिक्षक लोहित मतानी, सीआरपीएफचे लवकुमार, पंडीत इथापे यांच्यासह जे. एम. पटेल चे प्राचार्य विकास ढोमणे सर्व अधिकारी उपस्थित होते.
या बाईक रॅलीतील लीडर महिलांना पाहून विद्यार्थी-विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. महीला सक्षमीकरणासाठी निघालेली ही बाईक रॅली महीलांचा आत्मविश्वास वाढवणारी असल्याचे मत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केले. पाच राज्यामधून प्रवास करीत आलेल्या या बाईक रॅलीने 1300 किमीचा प्रवास केला आहे. भंडारा येथे आगमनानंतर या रॅलीचा छत्तीसगडमधील जगदलपूर येथे समारोप होईल. मंगळवार दि.21 रोजी सकाळी आठ वाजता कोब्रा कॅम्प चितापूर येथे या महीला रॅलीचे सदस्य विद्यार्थ्याशी संवाद साधतील. या दरम्यान शस्त्रास्त्र प्रदर्शनी, वेपन ड्रील, डॉग शो आदींचे आयोजन करण्यात आले आहे.