हॉटेल पॅसिफिकच्या कामगारांची दुचाकी जाळून आरोपी फरार


गोंदिया, १७ जानेवारी २०२३ : गोंदिया शहरातील रामनगर पोलिस ठाण्यांअंतर्गत असलेल्या रेलटोली गुजराती नॅशनल शाळेसमोर असलेल्या पॅसिफिक हॉटेलच्या कामगारांची चार दुचाकी काही समाजकंटकांनी जाळपोळ केल्याची घटना सोमवारी १६ जानेवारी ला पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीला पेट्रोल टाकून जाळण्याचे दोन अज्ञात आरोपींचे हे कृत्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यात टिपलेले आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास पेटविण्यात आलेल्या या चार दुचाकीमुळे जवळील सुर्यवंशी इंश्योरेन्स या कार्यालयाचे शटर व अरोरा मशिनरी ट्रेडर्स ही दुकान पूर्णपणे जळून या दुकानातील साहित्यांची राखरांगोळी झालेली आहे. पॅसिफिक होटल येथील सुरक्षा रक्षकाला काही तरी जळण्याचा वास आल्यामुळे त्यांनी बाहेर निघून बघितले असता चार ही दुचाकी धु-धु करून जळत असल्याचे दिसून आले.

त्यांनी याबाबतची सूचना जवळील अरोरा मशिनरीचे मालक यांना भ्रमणध्वनीवर देवून त्यांना बोलावून घेतले. तसेच आपल्या हॉटेलच्या इतर सहकार्याना बोलावून जवळील गुजराती शाळेतील नळ व हॉटेल येथील साहित्यांच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. या जाळपोळ प्रकरणात पॅसिफिक हॉटेल येथील कामगार नितीन गौतम, जितेंद्र जांभुळकर, मुकेश भावे, जितेंद्र वैद्य या चौघां कामगारांची सुर्यवंशी इंश्योरेन्स समोर उभी असलेली दुचाकी जळून राख झाल्यामुळे या प्रत्येकांचे ९० हजार रूपयांचे नुकसान झालेले आहे. तसेच हे सर्व कामगार जवळील कुणी धापेवाडा, कुणी दवनीवाडा आदी ठिकाणांहून याच दुचाकींनी ये- जा करीत असल्यामुळे यांना आता आपल्या घरी जाण्यापासून तर हॉटेल येथे डयूटीवर येण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढत्या घटनांमुळे समाजकंटकांचा वावर वाढत असून, त्यांच्यावर अंकुश लावण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. या प्रकरणातील चार दुचाकी मालकांसह अरोरा मशिनरीचे मालक यांनी रामनगर पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल केलेली आहे. सध्या चार दुचाकी मालकांसह अरोरा मशिनरीचे मालक यांची जाळपोळ प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरण तपासात घेण्यात आलेलं आहे. सीसीटीव्ही कॅमे-यात टिपण्यात आलेले दोन अज्ञात जाळपोळ करणा-यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.


 

Leave a Comment