- रोजगार सेवकांचे मानधन काढून देण्यासाठी मागितली 5 हजार रुपयाची लाच
गोंदिया, दि. 01 ऑक्टोंबर : जिल्ह्यातील तीरोडा तहसील अंतर्गत येत असलेल्या एका महिला सरपंचाने रोजगार सेवकांचे मानधन काढून देण्यासाठी लाचेची मागणी केली व ती लाच घेत असताना एसीबी ने कारवाई करीत महिला सरपंचाला बेड्या ठोकल्या आहेत.
महिला आरोपीचे नाव श्रीमती सरीता सुनील तुमसरे वय 34 वर्ष, पद – सरपंच, ग्राम पंचायत ईंदोरा (खुर्द) ता. तिरोडा असे असून सापळा कार्यवाही आज दि. 01 ऑक्टोंबर रोजी करण्यात आली आहे. 5 हजार रुपयाची लाच मागणी केल्या प्रकरणी ग्राम पंचायत कार्यालय ईंदोरा खुर्द, ता. तिरोडा येथे एसीबी ने सदरची सापळा कारवाई केली आहे.
एसीबी ने दिलेल्या माहिती नुसार तक्रारदार हे ग्राम पंचायत इंदोरा खुर्द अंतर्गत रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत त्यांचे माहे मार्च, एप्रिल, मे व जून 2024 या चार महिन्यांचे मानधन रक्कम रुपये 53 हजार 200 रुपये चे धनादेश ग्रामसेवक यांनी स्वताची सही करून तक्रारदार यांच्याकडे दिला, तक्रारदार हे सदर धनादेशावर सही घेण्याकरीता सरपंच श्रीमती सरीता तुमसरे यांना भेटले असता त्यांनी धनादेशावर सही करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. गोंदिया येथे तक्रार दिली, लाच मागणी पडताळणी कार्यवाही दरम्यान सरपंच श्रीमती सरीता तुमसरे यांनी तक्रार दाराच्या 53 हजार 200 रुपये रकमेच्या मानधनाच्या धनादेशावर सही करण्याकरीता पाच हजार रुपये रकमेच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली.
सापळा कारवाई दरम्यान सरपंच श्रीमती सरीता तुमसरे यांनी पंचासमक्ष 5 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असल्याने त्यांना लाच रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले असुन तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई विलास काळे पोलीस उप अधीक्षक, स.फौ. चंद्रकांत करपे, पो.हवा. संजय कुमार बोहरे, मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, कैलास काटकर म. ना. पो. शि. संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली आहे.