मुंबई, वृत्तसेवा, दि. 29 सप्टेंबर : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुका कधी लागतील ?
याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत महत्वाचे विधान केलं आहे. बारामतीमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.
“महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण आहे, लोकसभेला वेगळं चित्र होतं. राज्यातील जनतेचा मूड वेगळा आहे. कुठंही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोकं भेटतात. लोकांना खात्री झाली की या निवडणुकीत काही झालं तरी जिंकायचं आहे. चांगले निकाल लागतील यात शंका नाही. निवडणूक आयोग लवकरच तारीख ठरवेल, माझा अंदाज आहे की 6 ते 10 च्या दरम्यान तारखा जाहीर करतील. 15 ते 20 नोव्हेंबर च्या दरम्यान मतदान होईल असा अंदाज आहे,” असं शरद पवार म्हणाले. अशी माहिती “साम” डिजिटल ने आज दिली आहे.
“आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि लोकांच्यात चर्चा सुरू झाली आहे. दबक्या आवाजात चर्चा आहे ती इंदापूर मध्ये आहे याची त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थता आहे. सगळ्यांना विचारून निर्णय घेतला जाईल, निवडून येण्याची क्षमता बघितली जाईल. इंदापूरमध्ये बदल घडेल असे वातावरण आहे,” असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष बदलाची संकेत दिल्यानंतर इंदापूरमधील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या भेटीसाठी गोविंद बागेत इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आगामी विधानसभा निवडणुकासाठी इच्छुक उमेदवार आप्पासाहेब जगदाळेंनी प्रवीण माने देखील या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेण्याचा शरद पवार यांनी शब्द केला.