नदी काठावर जमा करून ठेवलेली २५० ब्रास रेती जप्त!


भंडारा, दिनांक : ०२ जानेवारी २०२२ : मोहाडी येथील दबंग तहसीलदार दीपक कारंडे यांनी गुरुवारी सायंकाळी मोहंगाव देवी, बोथली पांजरा आणि खमारी बुज. रेती घाटावर धाड टाकून नदी काठावर जमा करून ठेवलेली अंदाजे २५० ब्रास रेती जप्त केली. तसेच ही संपूर्ण २५० ब्रास रेती तेथून उचलून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवली आहे. शासकीय कामासाठी ही रेती लिलाव करण्यात येणार आहे. या कारवाईने रेती चोरांचे धाबे दणाणले असून त्यांचे मोठेनुकसान झाले आहे.

रेटिघाटांचे लिलाव काही वर्षांपासून झाले नाही. परंतु बांधकामाला रेतीची आवश्यकता असल्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेती काढून एखाद्याच्या शेतात ही रेती रात्रीला डम्पिंग करून ठेवली जाते. त्यानंतर जमा करून ठेवलेली ही रेती रात्रीलाच जेसीबीने टिप्पर मध्ये भरून भंडारा, पेट्रोलपंप, मौदा, नागपूर येथे पोहोचविली जाते. मोहंगाव देवी येथील रेती घाटावर १०० ब्रास रेती डम्पिंग करून ठेवली असल्याची माहिती तहसीलदार दीपक कारंडे यांना माहीत होताच त्यांनी तालुक्यातील इतरही रेतिघाटाची तपासणी केली.

यावेळी बोथली पांजरा, खमारी बुज. या रेतिघाटावरही रेतीचा साठा आढळल्याने ही सर्व रेती जप्त करण्याची कारवाई केली. परंतु जप्त केलेली रेती तेथेच ठेवल्यास ती संपूर्ण रेती चोरी जाण्याची भीती असल्याने ती रेती रात्रीच तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवण्यात आली आहे. या रेतीचा चार पाच दिवसात शासकीय कामासाठी लिलाव करण्यात येणार आहे. या कारवाईने रेती माफिफयांना नदीपात्रातून काठावर रेती पोहचविण्याचा जो खर्च आला तो खर्च पाण्यात बुडाल्याने त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.


 

Leave a Comment