गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचे योगदान : उद्धव ठाकरे


मुंबई, वृतसेवा, दिनांक : ०९ डिसेंबर २०२२ : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळं राजकीय नेते भाजप आणि मोदींचं अभिनंदन करत आहेत. त्यातच उद्धव ठाकरेंनी गुजरातच्या विजयाबद्दल मोदींच अभिनंदन करत त्यांना टोलाही लगावला आहे. ठाकरे म्हणाले की, गेल्या निवडणुकीत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्येही भाजप जिंकला होता. परंतु यावेळी हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस आणि गुजरातमध्ये भाजप जिंकली आहे. तसेच यावेळी त्यांनी दिल्ली मनपा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या विजयाचाही उल्लेख केला.

पुढं ठाकरे असंही म्हणाले की, यशाचे मानकरी आहेत, त्यांचे अभिनंदन करणारच आहोत. परंतु गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचे योगदान आहे, हे कुणी विसरू नये . एका बाजूला महाराष्ट्र ओरबाडला. गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योग पळवले, असा खोचक टोला ठाकरेंनी मोदींना यावेळी लगावला.

तसेच ठाकरेंनी सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरूनही भाजपवर टीका केली आहे. कर्नाटकातील निवडणूक समोर ठेवून, महाराष्ट्रातील गावे तोडली जातील की काय, अशी भिती निर्माण झाल्याचंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरेंचं कोणतंही वाक्य टोमण्याशिवाय पूर्ण होत नाही. यानिमित्तानं ठाकरेंना उद्योगांचं महत्व कळलं. यासाठी त्यांचं अभिनंदन. उद्योग घालवणारे तेच आहेत, असं फडणवीस ठाकरेंना म्हणाले.


साभार : थोडक्यात

Leave a Comment