अर्जुनी मोर, गोंदिया, दिनांक ; ०५ डिसेंबर २०२२ : दि. ०४ डिसेंबर रोज रविवारला आदिवासी गोंड गोवारी संघर्ष कृती समिती च्या वतीने अर्जुनी/मोर येथे 114 आदिवासी गोंड गोवारी शहीद बांधवांना श्रद्धांजली देण्यात आली. गोवारी गोंड शहीद बांधवाच्या श्रद्धांजली च्या कार्यक्रमात दिप प्रज्वलन मा. मनोहरराव चंद्रिकापुरे आमदार अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष होमराजजी ठाकरे, कार्यक्रमाचे उपाध्यक्ष दामोदर नेवारे, मुरलीधर मानकर, रूपेश चामलाटे, प्रभाकर नेवारे, बिसनजी भोंडे, भाष्कर कवरे, धनराज नेवारे, शिवदास साहारे, वासुदेव चचारे, पांडुरंग नेवारे, शालिकराज हातझाडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सर्वप्रथम शहीद गोवारी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पन केली. आमदार चंद्रिकापुरे यांनी मार्गदर्शन करतांना गोवारी समाजातील उपस्थित बांधवा समोर विचार प्रकट करतांना म्हणाले की, सामाजिक, सांस्कृतिक कार्याबरोबरच न्यायाच्या संघर्षासाठी गोवारी समाजाने कटिबद्ध असले पाहीजे.
समाजाची संस्कृती, विचार, भाषा, यावर जो समाज आत्मसात करेल त्यावर त्या समाजाची प्रगती अवलंबून असते 114 गोवारी शहीद बांधवांनी आपल्या समाजासाठी स्वतः चे बलीदान दिले. या शहीद बांधवांचे विचार आपल्या समाजातील विद्यार्थी समाजातील नागरीक यांनी त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करून समाज जागृती केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, वीर बिरसा मुंडा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या महामानवाचे विचार जो पर्यंत कोणताही समाज आत्मसात करत नाही. तोपर्यंत त्या समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक प्रगती होणार नाही. असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेब यांनी यावेळी केले.
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे गौंड गोवारी समाजाचा जात प्रमाणपत्र पासुन वंचित राहावे लागले. त्यामुळे गोवारी समाजातील विद्यार्थीचे नुकसान झाले. त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनेचा फायदा घेता येत नव्हते. या सर्व बाबींवर खासदार प्रफुल्ल भाई पटेल व माझे सुद्धा लक्ष आहे. ऐतिहासिक संदर्भ देवून न्याय मार्गाने गोवारी समाजाला स्मारकासाठी जागा अधिकृत करून देणार, उपलब्ध करून देणार अशी ग्वाही आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी उपस्थित गोवारी समाज बांधवांना दिली.