मुंबई, वृतसेवा, दिनांक : २० नोहेंबर २०२२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते, असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे. यावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा संघटनांनी अनेक ठिकाणी निषेध व्यक्त करत राज्यापालांच्या बॅनरला जोडे मारले आहेत. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते परभणीत बोलत होते.
“सर्वांना उठसूठ शिवाजी महाराजच दिसतात का?. राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करतात. यापूर्वीही त्यांनी शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबात विधाने केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही वादग्रस्त व्यक्ती महाराष्ट्रात का ठेवली आहे. त्यांना हटवण्याबद्दल याआधीही मागणी केली होती,” असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना म्हटलं, “तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे कोश्यारी म्हणाले.