महिलांचा मानवी तस्करीसाठी उपयोग, तीन महिन्यांत ८१२ मुली, महिला बेपत्ता, पाच जिल्ह्यांतील धक्कादायक प्रकार


अमरावती, वृत्तसेवा, दि. 30 जुलै 2022 : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यांत तब्बल ८१२ मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात १६ ते २५ वर्षे वयोगटातील महिलांची संख्या सर्वाधिक आहे.

अमरावती जिल्ह्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांमध्ये एकूण २७२ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या. पश्चिम विदर्भातील शिक्षणाचे केंद्र, कापडाचे भंडार म्हणून अमरावती शहराची ओळख आहे. शहराचा विस्तार झपाटय़ाने होत असताना कामगारांसाठी रोजगाराच्या संधी आहेत. नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने अमरावतीत येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येत शहरातून एकूणच हरवलेल्या व्यक्तींची संख्या, त्यातही विशेषत: अठरा वर्षांखालील हरवलेल्या मुलामुलींची संख्या वाढत आहे.

अनेक घटनांमध्ये मुलींच्या बाबतीत पळून जाऊन लग्न करणे, हे कारण प्रामुख्याने समोर येत असले, तरी त्याबाबत नंतर माहिती घेतली जात नाही, अनेक घटनांमध्ये बदनामीच्या भीतीने तक्रारही दिली जात नाही.

बेपत्ता होण्यामागे पतीसोबत भांडण करून घर सोडून जाणे, प्रेम प्रकरणातून पळून जाणे, रागाच्या भरात घरातून निघून जाणे, ही कारणे प्रामुख्याने समोर येत आहेत. यात ५० टक्के महिला परत आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातून काही महिलांचा मानवी तस्करीसाठी देखील उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार करून तपास करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यां रझिया सुलताना यांनी केली आहे.

अनेक कुटुंबांमध्ये अनपेक्षित इच्छा, अपेक्षा, वैचारिक मतभेद आणि इतर कारणांवरून लहान-मोठे वाद होत असतात. परंतु अशा परिस्थितीत मनावर ताबा न ठेवता किंवा कुटुंबाचा कुठलाही विचार न करता कुटुंबीयांसोबत असलेले नाते बाजूला सारून परिवाराला सोडून जाण्याच्या घटना वाढत आहेत.

गेल्या तीन महिन्यांत अमरावती शहरातून ९७, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून १७५ मुली आणि महिला हरवल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून १९४, बुलढाणा जिल्ह्यातून १७०, अकोला जिल्ह्यातून १०३, तर वाशीम जिल्ह्यातून ७६ मुली, महिला बेपत्ता झाल्या आहेत.


 

Leave a Comment