लाचखोर ! पुरवठा निरीक्षक अडकला एसीबी च्या जाळ्यात.


गोंदिया, दि. ३० जुलै २०२२ : तक्रारदार हे शेतकरी असुन त्यांचे वडीलांचे नावे मौजा लहीटोला पो. पांढराबोडी ता.जि. गोंदिया येथे सरकारी स्वस्त धान्य दुकान आहे. त्यांचे वडील वयोवृध्द असुन त्यांना कॅन्सरचा आजार असल्यामुळे प्रकृती बरोबर राहत नसल्याने तक्रारदार यांनी वडीलांचे नावाने असलेली सरकारी स्वस्त धान्य दुकान त्यांचे नावावर ट्रांसफर होण्याकरीता आवश्यक कागदपत्रासह पुरवठा विभाग, तहसिल कार्यालय गोंदिया येथे अर्ज सादर केला होता.



त्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक २७.७.२०२२ रोजी पुरवठा विभाग, तहसिल कार्यालय गोंदिया येथे जावुन त्यांचे विभागाचे पुरवठा निरीक्षक आरोपी श्री पंकज शिंदे यांना भेटुन त्यांनी दिलेल्या अर्जावर कार्यवाही करुन वडीलांचे नावाने असलेली सरकारी स्वस्त धान्य दुकान त्यांचे नावाने ट्रांसफर करुन देण्याची विनंती केली असता आरोपी श्री पंकज शिंदे यांनी सदर दुकान तक्रारदार यांचे नावाने ट्रांसफर करुन देण्यासाठी तक्रारदार यांना रु. ५०००/- ची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी श्री. पंकज शिंदे, पुरवठा निरीक्षक यांना सदर कामाकरीता लाच रक्कम रु.५०००/- देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी आरोपी विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता ला.प्र.वि., गोंदिया येथे तक्रार नोंदविली.



प्रस्तुत प्रकरणी आरोपी श्री. पंकज शिंदे, पुरवठा निरीक्षक, तहसिल कार्यालय गोंदिया याची तक्रारदाराकडे असलेल्या लाच मागणीच्या योग्य पडताळणीअंती दि. २९.०७ २०२२ रोजी आरोपी विरूध्द प्रशासकीय ईमारत, पहीला माळा तहसिल कार्यालय गोंदिया (ग्रामीण) रूम क्र.१२ पुरवठा विभाग येथे लाचेचा यशस्वी सापळा रचण्यात आला. या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी श्री पंकज शिंदे, पुरवठा निरीक्षक यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे वडीलांचे नावाने असलेली सरकारी स्वस्त धान्य दुकान तक्रारदार यांचे नावावर करुन देण्याकरीता तडजोडीअंती पंचासमक्ष रु. ४,०००/- लाच रकमेची मागणी करुन रु. ४०००/- लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारुन गैरफायदा घेतला. त्यावरून आरोपी विरूध्द पो.स्टे. गोंदिया शहर, जि. गोंदिया येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक श्री मधुकर गिते, अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनात श्री. पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस उपअधिक्षक, पोहवा मिलकीराम पटले, संजय बोहरे, नापोशि संतोष शेंडे मंगेश कहालकर, संतोष बोपचे व चानापोशि दिपक बाटबर्वे सर्व लाप्रवि, गोंदिया यांनी केली.


 

Leave a Comment