भंडारा येथे जल पर्यटनातून रोजगार निर्मिती होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भंडारा, दि. २५ : राज्य शासन सर्व सामान्यांचे व शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंर्तगत केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकारकडून सहा असे बारा हजार रुपये, सानुग्रह अनुदान व धानाला सातशे रुपये बोनस देणारे हे पहिले सरकार आहे. आता ५४७ कोटी रुपये खर्च करून भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. 102 कोटी रुपये खर्च करुन जल पर्यटन सुरु होत आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील जल पर्यटनासोबतच ५४७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज दी. २४ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वैनगंगा जलाशयातील जल पर्यटनाच्या वाढीव आराखड्यास मान्यता देण्याचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त (तीन एप्रिल ) सार्वजनिक सुट्टी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व पोलीस अधीक्षक लोहित मतानी उपस्थित होते.

जलपर्यटन केंद्राचा प्रथम टप्पा, भूमिगत गटार योजना, अमृत योजने अंतर्गत भंडारा आणि पवनी येथील तलाव सौंदर्यीकरण, नगरोत्थान अभियानाअंतर्गत रस्ते बांधकाम, भंडारा व पवनी नगर परिषद अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनांची कामे, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत भंडारा व पवनी नगर परिषदमध्ये विविध विकासकामे, जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे विविध सुविधा, सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध कामे या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला.

विकास कामांमुळे भंडारा जिल्ह्याला पर्यटकांची पहिली पसंती मिळणार आहे. जल पर्यटनाचा सध्याच्या 102 कोटी रुपयांचा आरा खडा 200 कोटी रुपयांचा करावा, अशी मागणी आमदार श्री. भोंडेकर यांनी आपल्या भाषणात केली होती. यावर वाढीव विकास आराखड्याला मंजुरी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

५४७ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या विकास कामामुळे भंडारा जिल्ह्यात पर्यटन विकासासोबतच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, असे आमदार श्री. भोंडेकर यांनी सांगितले. भूमिपूजनातील विशेष उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे जलपर्यटन प्रकल्प होय. या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार निर्मिती होईलच पण भंडारा जिल्हा भारताच्या नकाशावर अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी व्यक्त केला.

जलपर्यटन प्रकल्पाची वैशिष्ट्ये

भंडारा येथील मौंदी येथे असलेला हा जल प्रकल्प जागतिक दर्जाचा आहे. भंडारा जिल्ह्यातील जलपर्यटन प्रकल्पात नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी आसन व्यवस्था, विविध प्रकारच्या खाद्य प्रकारांचे उच्च दर्जाचे उपहारगृह, पर्यटकांना पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नाविन्यपूर्ण कृत्रिम तलाव, पर्यटकांसाठी विविध सुविधा, जलतरण तलाव, माहिती केंद्र, कॉन्फरन्स हॉल, व्यवस्थापक आणि कर्मचारी निवास तरंगती जेट्टी वाहनतळ यांचा समावेश असेल.

Leave a Comment

और पढ़ें