निकृष्ठ दर्जाचा शालेय पोषण आहार पुरवठा! केला परत.


अर्जुनी मोर. गोंदिया, ( संतोष रोकडे )  दि. 03 जुलै 2022 : शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्य भोजनासाठी पुरविण्यात येणारा शालेय पोषण आहार साहित्य निकृष्ठ दर्जाचा आला असल्याने अर्जुनी मोर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील राजोली केंद्रातंर्गत येणा-या नऊ शाळांतील मुख्याध्यापकांनी आलेला शालेय पोषण आहार साहित्य परत केल्याची बाब पुढे आली आहे. व तशी तक्रार 25 जुन रोजी अर्जुनी मोर. पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी यांचे कडे केली आहे.

याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना केलेल्या तक्रारीनुसार 25 जुन रोजी शालेय पोषण आहार पुरवठादार हरी राईस एन्ड एग्रो.लि.गोंदिया यांनी राजोली केंद्रातंर्गत येणा-या राजोली, कन्हाळगाव, सायगाव, शिवरामटोला, भरनोली, बोरटोला, खडकी, नविनटोला, या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सह चंद्रभागा विद्यालय राजोली या नऊ शाळांना शालेय पोषण आहार चारचाकी वाहनाने पाठविले.

केंद्रातंर्गत सर्व मुख्याध्यापक यांनी शालेय पोषण आहार साहित्य सामुहिकरित्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव, ईळदा येथे तपासले असता तांदळाचा दर्जा अत्यंत निकृष्ठ दर्जाचा आढळुन आला. सोबतच मटकी,तूरडाळ,व वाटाणा, या साहित्याचा दर्जा मध्यम प्रतीचा आढळुन आल्याने सर्व मुख्याध्यापक यांनी तांदूळ उतरविण्यास स्पष्ट नकार दिला.

शालेय पोषण आहार साहित्य घेवुन आलेली गाडी साहित्यासह परत केली. पुरवठादारांना वारंवार सांगुनही वजनकाटा सोबत आणलेला नव्हता. परत केलेल्या साहित्याचा पंचनामा करताना शाळा व्यवस्थापन समिती राजोलीचे अध्यक्ष रेशीम झोळे प्रामुख्याने उपस्थित होते.

शासकीय कार्यालयाला पूरविलेल्या सॅम्पल नुसार शालेय पोषण आहार साहित्य पुरवठाधारकाने पाठवावे व सोबत वजन काटा आणावा अन्यथा यापुढे कुठलाही शालेय पोषण आहार साहित्य उतरविला जाणार नाही. अशी भूमिका राजोली केंद्रांतर्गत येणाऱ्या नऊ शाळेतील मुख्याध्यापकांनी घेतली आहे. व अशा प्रकारची तक्रार गटशिक्षणाधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्याकडे केली आहे.


 

Leave a Comment