वन विभागाच्या परिसरात; रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू !!


अर्जुनी, मोरगाव,  गोंदिया, दिंनाक : ११ जून २०२२ : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गोंदिया – बल्लारशा रेल्वे मार्गावर कोरंभी राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्र : २६० येथे दि. १० च्या रात्री शुक्रवारी घडली सकाळी रेल्वे मार्गावर गस्त घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली.

मृत वाघाचे वय अंदाजे सहा ते सात वर्षे असल्याचे सांगण्यात येते. नेमक्या कोणत्या रेल्वेने वाघाला धडक दिली ते कळू शकले नाही. तालुक्यात वाघाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यापूर्वी कालीमाती जंगल परिसरात वाघाची शिकार उजेडात आली होती. तालुक्यात सहा महिन्यात वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे.

कोरंभी -चारभट्टी देवस्थान मार्गादरम्यान गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्ग आहे. शुक्रवारी रात्री या मार्गाने धावणाऱ्या रेल्वे गाडीने वाघाला धडक दिली. शनिवारी सकाळी या रेल्वे मार्गाची गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यानी मृत वाघाची माहिती वनविभागाला कळविली. वाघाची कंबर व डाव्या पायाची मांडी तुटलेली असल्याचे प्रथम दर्शनी दिसते.

त्याच्या शरीरावर मागील बाजूस खरचटले आहे. वाघाच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री गोंदिया-बल्लारशा रेल्वेने झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी गोंदियाचे उपवनसंरक्षक कुलराजसिंह, नवेगावबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी दादा राऊत, वन परिक्षेत्राधिकारी श्रावण खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक वासुदेव वेलतुरे, उमेश गोटेफोडे, वनरक्षक प्रियंका राऊत व वनकर्मचारी उपस्थित होते.


 

Leave a Comment