रोहिणी खडसे यांच्या वाहनावर प्राणघातक हल्ला


जळगाव, दिनांक 28 डिसेंम्बर 2021 – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास रोहिणी खडसे यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली, त्यानंतर रॉडने हल्ला करण्यात आला. रोहिणी खडसे या हल्ल्यातून सुखरुप बचावल्या आहेत. मात्र या घटनेनंतर जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

रोहिणी खडसे एका कार्यक्रमातून मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन दुचाकींवरुन आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवत कार रस्त्यावरून बाजूला नेली. चालकाने रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केलं यामुळे सुखरूप बचावले.

पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांनी या हल्ल्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “रोहिणी खडसे आपले स्वीय सहाय्यक आणि चालकासह मुक्ताईनगरकडे येत असताना काही अज्ञातांनी रॉडच्या सहाय्याने त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीच्या पुढील काचेवर रॉडने हल्ला करण्यात आला. या घटनेचा तपास सध्या सुरु आहे”.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीनंतर एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात बोलताना आपलं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होत आहे असं वक्तव्य केलं होतं. त्याच रात्री रोहिणी खडसे यांच्याववर हल्ला झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

“मुक्ताईनगरच्या या पावनभूमीत महिला लोकप्रतिनिधी आहेत. अशा या मतदारसंघात महिला लोपकप्रतिनिधीवर हल्ला होत असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. मी तीव्र शब्दात याचा निषेध करतो,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान रोहिणी खडसे मुक्ताईनगरमधील अवैध धंद्याविरोधात आवाज उठवत असून त्यातूनही हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


 

Leave a Comment