संतप्त गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप, सडक अर्जुनी तालुक्यातील प्रकार

  • यशवंतग्राम चिचटोला येथील राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त जि.प. शाळा, स्वयसेवकांच्या भरवश्यावर

सडक अर्जुनी, दि. 31 ऑगस्ट : तालुक्यातील यशवंत ग्राम चिचटोला येथील जि.प. शाळेला सन २००७ मध्ये राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कर, सन २०२३ मध्ये अदानी फाऊंटेशन तर्फे तालुक्यातून प्रथम पुरस्कार मिळाले आहे. तसेच या शाळेला स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून सानेगुरुजी आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाले आहे. या शाळेत इयत्ता १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत.

शाळेची पटसंख्या ३८ आहे. शाळेत दोन शिक्षक व दोन स्वयंसेवक कार्यरत आहेत. येथील एका शिक्षकांची पदोन्नती अंतर्गत बदली २२ जुलै २०२४ रोजी करण्यात आली. तसेच एक शिक्षक ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. येथील रिक्त शिक्षकांचे जागेवर नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती ग्रा.प. प्रशासन व गावक-यांनी शिक्षणाधिकारी बि.ओ., बि.डी.ओ., केंद्रप्रमुख यांना एक महिन्यापासून पाठपुरावा करून निवेदन दिले.

मात्र आजपावेतो शिक्षकांची प्रशासनाने नियुक्ती केली नाही. त्यामुळे संतप्त गावक-यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रा.प. प्रशासन यांनी (आज 31 रोजी) शाळेला कुलूप ठोकले. यावेळी बि. ओ. हजर होते मात्र त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन पत्रकार व मिडीया येत असल्याचे समजताच तेथून पसार झाले. सध्या शाळेचा कारभार स्वयंसेवकांच्या भरवश्यावर असून तेच विद्यार्थ्यांना विद्यार्जन करीत असल्याची माहिती माजी सरपंच अनिता बांबोडे माजी सरपंच, धनजय कापगते अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, निर्मला कापगते सरपंच, हेमकृष्ण कापगते पालक यांनी दिली आहे. तालुक्यात अनेक शिक्षकांच्या खांद्यावर अतिरिक्त कार्यभार आहे. आता तर स्वसेवकांच्या भरवश्यावर शाळा सुरू असल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

 

Leave a Comment

और पढ़ें