ग्राहक तक्रार निवारण मंचाचा महावितरणला दणका, 12400 रुपये दंड! 

अमरावती, दि. 31 ऑगस्ट : शेती पंपासाठी मुदतीत विज पुरवठा न दिल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण मंच अमरावती यांनी महावितरणला 12 हजार 400 रुपयाचा दंड ठोठावला आहे. याबाबत वस्तुस्थिती अशी की येवदा येथील रहिवाशी वंसत लोखंडे ता. दर्यापुर जि. अमरावती यांनी महावितरण कार्यालय यांच्याकडे दि. 29-11-2016 रोजी अर्ज सादर केला. त्यानंतर महावितरणकडुन अर्जदार यांना 6200 रुपयाचे कोटेशन देण्यात आले. ग्राहकाने कोटेशन रक्कमेचा भरणा केला. माञ महावितरणकडुन ग्राहकाला विज पुरवठा न देताच पुन्हा अर्ज सादर करण्याबाबत सांगण्यात आले. मग कोटेशन भरून काय फायदा म्हणुन ग्राहक वंसत लोखंडे यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता व महाराष्ट्र राज्य विज ग्राहक संघटना शेगांव तालुका अध्यक्ष अंबादास पवार यांचे माध्यामातुन महावितरण च्या अमरावती परिमंडळ स्तरिय मा. ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे लोखंडे यांनी तक्रार दाखल केली.

विज अधिनियम 2003 चे कलम 42 नुसार विजेचा पुरवठा करणे हे महावितरणचे कर्तव्य आहे. तसेच विज अधिनियम 2003 चे कलम 43 नुसार अर्जदाराने विज पुरवठ्याची मागणी करणारा अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्याच्या आत व नविन जोडणी करिता वितरण वाहिनीची क्षमता वाढ किंवा नविन वाहिनी उभारणे महावितरणला गरजेचे असल्यास नव्वद दिवसात काम पुर्ण करून विज पुरवठा देणे बंधनकारक आहे.

पायाभुत सुविधाची उभारणी करणे हे महावितरणचे कर्तव्य असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपिल क्र. 7572/2011 मध्ये सुध्दा नमुद केलेले आहे. वसंत लोखंडे यांच्या तक्रारीवर दि. 13-8-24 रोजी मंचाकडे सुनावणी घेण्यात आली. महावितरणकडुन अर्जदार यांचा अर्ज रद्द करण्यात आला असे सांगण्यात आले माञ अर्ज रद्द करतेवेळी महावितरणकडुन अर्जदार यांना कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही.

याबाबत मा. मंचाकडुन पञ व्यवहाराची माहीती महावितरणला सादर करताच आली नाही. तसेच महावितरणने अर्ज रद्द केला तर अर्जदाराने भरलेली सुरक्षा ठेव महावितरणने परतच केली नाही. मग अर्ज रद्दच कसा झाला ? विदयुत कायदा 2003 चे कलम 43 नुसार महावितरणने नविन विज पुरवठा करण्याकरिता दिलेल्या कालमर्यादेचे पालन करणे गरजेचे असते. महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग विनियम 2021 विनियम 58 नुसार अर्जदाराने कोटेशन रक्कमेचा भरणा केलेल्या दिंनाक पासुन 30 दिवसात नविन विज वाहिनी उभारणे गरजेचे असल्यास नव्वद दिवसात विज पुरवठा देणे बंधनकारक आहे.

ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रार अर्जावर ग्राहक तक्रार निवारण मंचाने सुनावणी घेवुन मंचाने दि. 26-8-24 रोजी आदेश पारित केला की महावितरणने अर्जदारास दोन महिन्यात कृषिपंप विज जोडणी दयावी. तसेच विज जोडणी विलंबापोटी सेवा जोडणी आकाराच्या दुप्पट रक्कम म्हणजे 6 हजार 200 च्या दुप्पट 12 हजार 400 नुकसान भरपाई म्हणुन अर्जदारास पहिल्या विज बिलामध्ये विज देयकाद्वारे अदा करावी.

तसेच आदेशाची अमलबंजावणी करुन अहवाल मंचास सादर करावा. सदर प्रकरणी मंचासमोर महावितरणकडुन व्ही.आर. काटोले उपकार्यकारी अभियंता यांनी बाजु मांडली तर ग्राहकाच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व विज ग्राहक संघटना शेगांव तालुका अध्यक्ष अंबादास पवार शेगाव यांनी बाजु मांडून प्रकरणाचा पाठपुरावा केला असल्याची माहिती दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें