गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक 16 डिसेंम्बर 2021 – युवा तंत्रज्ञान शेतकरी गटामार्फत दि 7 ते 13 डिसेंम्बर 2021 दरम्यान दि – ७/१२ चे औचित्य साधून 15 शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या अभ्यास दौऱ्याचे संपूर्ण नियोजन कृषी सहाय्यक राजशेखर राणे यांनी करून दिले. या अभ्यास दौऱ्यादरम्यान कोकण कृषी विद्यापीठ दापोली, फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, नाशिक परिसरातील आधुनिक शेती तंत्रज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन शेतकरी गटामार्फत करण्यात आले होते.
गोंदिया पासून वेंगुर्ले हे अंतर खूप जास्त असल्याकारणाने कमी वेळात अभ्यास दौरा पूर्ण करण्यासाठी राजशेखर राणे कृषि सहाय्यक यांनी शेतकऱ्यांपुढे विमान प्रवास केल्यास वेळेची बचत होईल असा प्रस्ताव शेतकरी गटप्रमुखाकडे मांडला. गट प्रमुखांनी विमान प्रवास करण्याचा मार्ग निवडला व गटातील सर्व 15 सदस्यांनी त्या निर्णयाला होकार दर्शवला.
नागपूर ते गोवा विमान प्रवासाचे तिकीट आरक्षित करून घेतले, गटामार्फत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांच्याकडे अभ्यास दौऱ्यादरम्यान कृषि विभागा मार्फत दोन कृषी सहाय्यक मार्गदर्शक म्हणून मिळणे बाबत गट प्रमुखांनी विनंती केली, त्यावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी तात्काळ रोशन लिल्हारे गोंदिया, राजशेखर राणे सडक/अर्जुनी यांना शेतकरी गटासह अभ्यास दौऱ्यास पाठवण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश संबंधित कृषि सहायकांच्या तालुका कृषी अधिकारी यांना दिले. तसेच विभागीय अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती प्रज्ञा गोडघाटे यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी विमानतळावर प्रत्यक्ष जाऊन सर्व शेतकऱ्यांना दौरा यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
दिनांक 7 ते 13 डिसेंबर दरम्यान शेतकऱ्यांनी अभ्यास दौरा पूर्ण केला, या अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांनी टिशू कल्चर चे रोपे बनवण्याचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष प्रयोग शाळेत घेतले काजू लागवड , आंबा लागवड , शेततळ्यातील मत्स्यपालन, रोपवाटिका, दुधाळ जनावरांचे संगोपन, हळदी लागवड अशा बऱ्याच बाबींवर अभ्यास पूर्ण केला. त्याच बरोबर शेतकऱ्यांनी गोवा येथे मुक्काम ठोकून दौऱ्याचा आनंद घेतला, हा प्रवास अविस्मरणीय असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, या दौऱ्यामध्ये शेतकरी गोपाल जमदाळ, किशोर तरोने, मोरेश्वर मेश्राम, कमलेश शेंडे, शंकर खोटेले, योगेश कोरे ,शुभम मेश्राम, नरेश जमदाळ, लोकेश तरोने, प्रवीण तवाडे, शामराव चुटे, टिकाराम चुटे, हेमराज लंजे, चंद्रशेखर सुरसाऊत , विश्वनाथ तरोने, सर्व युवा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला, कृषी सहायक राजशेखर राणे यांनी सांगितले की संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये हा शेतकऱ्यांचा प्रथमच विमान दौरा आहे.