चंद्रपूर, वृत्तसेवा, दिनांक 17 – चंद्रपूर येथे दुचाकीचोरीच्या घटना वाढतानाच दिसत आहेत. पोलिस या चोरांना पकडण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. पोलिसांनी नुकतेच एका वाहनचोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं आणि चक्क या टोळीमध्ये राष्ट्रवादीची पदाधिकारी असलेल्या युवतीचाही समावेश असल्याचं आढळून आलं आहे.
या तरूणीकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं शहराध्यक्ष हे पद आहे. दुचाकीचोरीच्या घटना चंद्रपूरमध्ये सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे पोलिस या दुचाकीचोरांच्या शोधात होते. यावेळी पोलिसांना एक व्यक्ती दुचाकी विकण्यासाठी ग्राहकाचा शोध घेत आहे. अशी माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्यानंतर सापळा रचून या टोळीला अटक केली आहे.
सदर तरूणी आणि तिचे दोन साथीदार हे तिघे मिळून दुचाकी चोरी करत असे. सर्वात आधी ते लॉक नसलेल्या दुचाकीवर नजर ठेवायचे. त्यानंतर संधी मिळताच ती गाडी ढकलत ढकलत दुसरीकडे घेऊन जायचे. त्यानंतर ते गाडीची नंबरप्लेट बदलून कमी किमतीत ती गाडी विकून टाकत असे. अशी माहिती तपासात समोर आली आहे.
या टोळीने आतापर्यंत 19 दुचाकी चोरल्या असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकींसह 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणानंतर चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी या तरूणीचं महिन्यापूर्वीच निलंबन केलं असल्याचं सांगितलं आहे.