हेलिकॉप्टरचा पंखा तुटल्याने कल्पक तरुणाचा अकाली बळी.


यवतमाळ, दिनांक 12 ऑगस्ट 2021 – केवळ आठवा वर्ग शिकलेल्या एका तरुणाने अतिशय कल्पकतेने आणि स्वबळावर हेलिकॉप्टर तयार केले. येत्या १५ ऑगस्टला हे हेलिकॉप्टर आकाशात उडवून आपल्या स्वप्नांना गवसणी घालू, असा निर्धार त्याने केला. परंतु, या चाचणीदरम्यान या हेलिकॉप्टरचा पंखा तुटल्याने झालेल्या अपघातात या कल्पक तरुणाचा अकाली बळी गेला. शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम (२४) असे त्याचे नाव असून तो येथील फुलसावंगी गावाचा रहिवासी होता.

शेख इस्माईल पत्रे कारागीर असल्याने तो अलमारी, कूलर अशी विविध उपकरणे बनवायचा. त्याचे शिक्षण फक्त आठवीपर्यंतच झाले होते. एक दिवस त्याला हेलिकॉप्टर बनवण्याची कल्पना सुचली. आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्याने हेलिकॉप्टर तयार करण्यास सुरुवात केली.

हेलिकॉप्टरसाठी लागणारा एक एक सुटा भाग तो तयार करीत होता. मंगळवारी रात्री त्याने हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले. इंजिन ७५० अ‍ॅम्पियरचे होते. चाचणी व्यवस्थित सुरू असताना अचानक हेलिकॉप्टरचा मागचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर धडकला आणि आकाशाला गवसणी घालण्याआधीच शेख इस्माईलने डोळे मिटले. त्याच्या पश्चात वृद्ध वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.

स्वदेशी हेलिकॉप्टर बनविण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या मुन्ना शेख याचे गावातील नागरिकांकडून कौतुक होत होते. त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गावाचे नावही जगासमोर येईल, हा विश्वास फुलसावंगीसह आजूबाजूच्या गावकऱ्यांना होता. त्याचे गावाचे नाव जगभर पोचवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने आता गावात हळहळ व्यक्त होत आहे.

पत्रे कारागीर असलेल्या शेख इस्माईल याने दोन वर्षे कठोर परिश्रम करून स्वत:च हेलिकॉप्टर बनवले होते. १५ ऑगस्टला शेख इस्माईल हे हेलिकॉप्टर आकाशात उडवणार होता. त्यासाठी मंगळवारी रात्री तो हेलिकॉप्टरची चाचणी घेत होता. या दरम्यान हेलिकॉप्टरच्या मागील बाजूचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर येऊन आदळला. हा मुख्य पंखा शेख इस्माईलच्या डोक्यावर आदळला. यात तो गतप्राण झाला.


 

Leave a Comment