मुंबई, वृत्तसेवा, दिनांक – 21 जुलै 2021 – दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर आता 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर या परीक्षेची तारीख जाहीर झाली असून याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
दोन्ही वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा आता 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. कोरोना नियमांचं पालन करुन ही परीक्षा होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. ही परीक्षा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं मान्यता देण्यात आल्याचं गायवाड यांनी म्हटलं आहे.
सन 2020-21 च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून 8 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा, असं वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.