- पटोलेंच्या वादग्रस्त विधानां बाबत काँग्रेस अध्यक्षांकडेही तक्रार.
दिल्ली, वृत्तसेवा, दिनांक – 21 जुलै 2021 : स्वबळाची घोषणा देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सुरू झालेले ‘बिघाडी’ नाट्य संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुढाकार घेतला. मंगळवारी पटोले यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली त्यावेळी राहुल गांधींनी पटोलेंना आघाडी सरकारमध्ये राहूनच पक्षाचा विस्तार करण्याची तसेच आघाडीत बिघाडी न करण्याची तंबी दिल्याची माहिती सूत्राने दिली. या बैठकीत काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील, सरचिटणीस के.सी. वेणुगोपालही उपस्थित होते.
पटोलेंच्या विधानावरून शिवसेनेनेही काँग्रेस नेतृत्वाकडे काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत ‘पटोले लहान नेते’ असल्याचा टोमणाही हाणला होता. त्यानंतर प्रभारी पाटील यांनी कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्यासोबत पवार यांच्या घरी जाऊन स्पष्टीकरणही दिले होते. पटोलेंच्या विधानांवरून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही नेतृत्वाकडे तक्रार केली होती. त्यामुळेच राहुल गांधी यांनी पटोलेंना दिल्लीत बोलावून घेतले होते, अशी माहिती सूत्राने दिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाँधी व राहुल आघाडी सरकारचे किंगमेकर शरद पवार यांची नाराजी ओढवून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्यानेच पटोलेंना तंबी देण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.
काही दिवसांपूर्वीच पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कार्यक्रमावर नजर ठेवतात असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानावर कठोर शब्दात आक्षेप नोंदवित पवार यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंकडे तक्रार केली होती. त्यानंतर पटोलेंच्या वादग्रस्त विधानांबाबत काँग्रेस अध्यक्षांकडेही तक्रार करण्यात आली व त्यानंतर राहुल गांधींनी पटोलेंना दिल्लीत बोलावून कानपिचक्या दिल्याचे समजते.