अर्जुनी मोर., दि. 03 जानेवारी : अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने 2 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान ‘रेझिंग डे’ सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्त सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महा विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक व रस्ता सुरक्षा पथकाच्या वतीने पोलीस स्टेशनला भेट देऊन ‘रेझिंग डे’ ची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. सामान्य नागरिकांत पोलीस प्रशासनाविषयी विश्वासार्हता निर्माण व्हावी, हाच प्रामुख्याने ‘रेझिंग डे’ चा उद्देश असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणा कायदा व सुव्यवस्था सांभाळणारी यंत्रणा असून पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी विविध कार्यप्रणाली, सीसीटीएनएस ट्रेकिंग, दैनंदिन घटकांची नोंद पोलीस डायरीमध्ये कशी घेण्यात येते याविषयी माहिती दिली. यासोबत कांबळे मेजर यांनी विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या वतीने उपयोगात येणारी विविध शस्त्रास्त्रे व त्यांची उपयोग पद्धती याविषयी सांगितले.
यासारखे शस्त्रे जर सामान्य नागरिकांकडे किंवा शस्त्रासाठी उपयोगात येणारी साहित्य कुणाकडे आढळल्यास, त्याविषयी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी, असे आवाहन केले. तर वाहतूक विभागाचे गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ निमित्ताने रस्त्याविषयीचे नियम व त्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी याविषयीची माहिती दिली व विनापरवाना वाहन चालविल्यास त्याबद्दल असलेली शिक्षेची तरतूद विद्यार्थ्यांना अवगत करून दिली.
यासोबत सायबर सुरक्षा म्हणजे काय व आपण ‘डिजिटल अरेस्ट’ होऊ नये याकरिता घ्यावयाची खबरदारी कोणती, याविषयीची माहिती कॉन्स्टेबल लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी या निमित्ताने पोलीस स्टेशन मधील दूरसंचार कक्ष, तपास कक्ष, महिला समुपदेशन अशा विविध बाबींची माहिती भेटीदरम्यान जाणून घेतली.
रेझिंग डे च्या यशस्वीतेकरिता अर्जुनी मोर. येथील पोलीस स्टेशन विभागाचे सर्व कर्मचारी तसेच सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी. पठाण यांच्या मार्गदर्शनात रासेयो प्रमुख इंद्रनील काशीवार, नंदा नागपुरे, मुकेश शेंडे, कैलाश कापगते, ज्योती शेळके, नयना हटवार व लोपामुद्रा क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)