मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्या नंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या – एकनाथ खडसे


मुंबई, वृत्तसेवा, दिनांक – ०८ जुलै २०२१ – माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ED कडून तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर रात्री ८ च्या दरम्यान खडसे ED कार्यालयातून बाहेर पडले. दरम्यान, ED कार्यालयातून बाहेर आल्यानंतर खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळले. ED कडून कथित भोसरी MIDC जमिन गैरव्यवहार प्रकरणी आज (७ जुलै) एकनाथ खडसे यांची ही चौकशी झाली आहे.

एकनाथ खडसे स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, खडसे यांच्या वकिलांनी याबाबतची पूर्ण माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांचे वकील म्हणाले की, “एकनाथ खडसे यांनी ED अधिकाऱ्यांना चौकशीत पूर्ण सहकार्य केले आहे. अनेक स्टेटमेंट तपासण्यात आले. तसेच ED ला आवश्यक ती सर्व कागदपत्र देखील आम्ही दिली आहेत. आम्ही आणखी आवश्यक कागदपत्रे देखील पुढील १० दिवसांत देऊ. तसेच यापुढेही आवश्यक असेल तेव्हा चौकशीला उपस्थित राहू असे आश्वासन खडसे यांनी दिले आहे”, असे खडसे यांच्या वकीलांनी सांगितले आहे.

एकनाथ खडसे आज सकाळी ईडी कार्यालयात हजर झाले. यावेळी चौकशीपूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, “मला या कारवाईमागे राजकीय वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. राष्ट्रवादी प्रवेशानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. मला छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे. जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर ‘अभी कुछ होनेवाला है” असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे स्पष्ट दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. पूर्ण सहकार्य करणार आहे.”

भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंची भूमिका

“MIDCच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत” असं खडसे काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते.


 

Leave a Comment