चंद्रपूर, प्रतिनीधी, ब्रम्हपुरी, दीं. १२ जून २०२२ : ब्रह्मपुरी तालुक्यापासून ३६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा हळदा येथे राजू अर्जुन कांबळे वय ४२ वर्ष या इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची माहिती आज दुपारी ०३: ३० वाजता च्या सुमारास समोर आली आहे. प्राप्त माहिती नुसार.
मृतक इसम हा काही कामानिमित्त पत्नी व मुलासह झुडपी जंगलातील पायवाटेने जात असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर झडप घेतली आणि त्याला जागीच ठार केले.
तर पत्नी व मुलाच्या ओरडण्यामुळे वाघ तिथून पळून गेला. मृतक राजू याला दोन मुले असून बराच मोठा आप्तपरिवार आहे. घटनास्थळी ब्रह्मपुरी वनविभाग व पोलीस विभाग दाखल झाले असून लोकांच्या हालचाली वर नियंत्रण ठेवून आहेत.
गांगलवाडी ,बरडकीन्ही, चिचगाव, डोरली, वान्द्रा ,कोसंबी ,आवळगाव , हळदा, मुडझा आणि परिसरात रोज समूहाने वाघाचे दर्शन घडत असते. मागील महिन्यातच आवळगाव येथिल तुळशीराम कांबळे या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले होते.
आता शेतीचा हंगाम सुरु झाल्यामुळे लोकांना शेती करण्यासाठी आपल्या शेतात जावे लागते. त्यामुळे परिसरातील अशा नरभक्षी वाघांचा, आणि इतर वाघांचा बंदोबस्त करून परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना भयमुक्त जीवन जगण्यास, शेतीची कामे करण्यास त्वरित वनविभागाने पाऊले उचलावी अशी हळदा व परिसरातील जनतेची मागणी आहे.