अर्जुनी मोर. दि. 19 जुलै : बल्लारशा रेल्वे लाईनवरील सुकडी- दाभणा फाट्या शेजारी असलेल्या बोगद्याजवळ दोन अस्वल वन्य प्राणी आज (ता.१८) रोजी मृतावस्थेत आढळून आले. याबबातची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी वन विभागाला दिली वन विभागाकडून मौका पंचनामा करत दोन्ही वन्य प्राण्यांचे सर्व शवविच्छेदन करून स्थानिक वन क्षेत्रातच दहन करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी एस. डी. खोब्रागडे यांनी दिली.
तालुक्यातील गोंदिया – बल्लारशा रेल्वे लाईन ही अर्जुनी मोरगाव वन क्षेत्रातून गेली असल्यामुळे परिसरात वन्य प्राण्यांचा आवागमन मोठ्या प्रमाणात होत असते. दरम्यान सकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांना सुकळी फाट्यावरील बोगदाजवळ दोन अस्वल मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले. वनविभागाच्या वतीने त्याची तात्काळ दखल घेत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. प्राथमिक दृष्ट्या दोन्ही अस्वल वन्यप्राणी हे रेल्वेच्या धडकेत मृत पावल्याचे समजून आले.
त्यामुळे वन विभागाकडून दोन्ही वन्यप्राण्यांवर स्थानिक अर्जुनी मोरगाव वनक्षेत्रात प्रकाष्ट निष्कासन अधिकारी एस. जी. अवगान, वन परिक्षेत्राधिकारी एस. डी. खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पशुधन विकास अधिकारी उज्वल बावनथडे यांनी स्थानिक डेपो परिसरात शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. या घटनेचा तपास सहायक वनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई यांच्या मार्गदर्शनात प्रकाष्ट निष्काशन अधिकारी एस. डी. अवगान करीत आहेत.