तपासात मिळाले घबाड : 1 कोटी 8 लाख रुपये रोख, 10 तोळे सोने, साडे पाच किलो चांदी आणि सहा ठिकानी प्रॉपर्टी चे कागदपत्रे जप्त.
बीड, वृत्तसेवा, दि. 17 मे 2024 : लाचखोरी मध्ये पोलीस विभाग सुद्धा मागे नसून एलसीबी विभागातील बडे अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला तब्बल एक कोटी रूपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता पाच लाख रूपये खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आले. याप्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकासह सहायक फौजदार आणि खासगी इसम विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील निरीक्षक आणि एएसआय दोन्ही फरार आहेत.
लोकमतने दिलेल्या माहिती नुसार बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री घर झडती घेतली असता आरोपी खाडे यांच्या बीड मधील किरायच्या घरात रोख 1 कोटी 8 लाख रुपये, 10 तोळे सोने, साडे पाच किलो चांदी आणि सहा ठिकाणच्या प्रॉपर्टी चे कागदपत्रे सापडले आहेत. पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
हरिभाऊ खाडे हे एलसीबी चे पोलिस निरीक्षक आहेत तर सोबत सहायक फौजदार आर. बी. जाधवर या दोघांना निलंबीत केले आहे. हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्या प्रकरनात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडे यांनी १ कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते.
ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रूपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबीत केले आहे.
जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळा प्रकरण…
बीड जिल्ह्यात झालेल्या जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात मोठ्या व्यक्तींचे नाव असण्याची शक्यता आहे. याच प्रकरणात आरोपी न करण्यासाठी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व एकाने तब्बल १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सदरची कारवाई बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे, भारत गारदे यांच्यासह सहकाऱ्यांनी केली.