आदिवासींच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीहल्ला, मणिपूरचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद


नाशिक, दी. 30 जुलै 2023 : मणिपूरमध्ये आदिवासी महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी नाशिकच्या सटाण्यात काढलेल्या प्रचंड मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा संतापजनक प्रकार आज घडला. आदिवासी बांधवांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करताना ‘अर्धनग्न’ मोर्चा काढून तहसील कार्यालयात निवेदन दिले. यानंतर दोधेश्वर नाका येथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीत प्रचंड तणाव वाढल्याने पोलिसांनी लाठीहल्ला केला. यामुळे दगडफेक आणि वाहनांची तोडफोडी झाली.

यावेळी शहरात तणाव वाढल्याने व्यापारी-व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. त्यामुळे व्यवहारही ठप्प झाले. सामना या वृत्त पत्राने दिलेल्या माहिती नुसार, मणिपूरमधील हिंसाचार आणि आदिवासी महिलांना विवस्त्र करून धिंड काढणाऱया जमावातील सर्व आरोपींना फाशी द्यावी, आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशा प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. दुपारी 1 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करीत शहरातील मुख्य मार्गावरून अर्धनग्न आदिवासी युवक व महिला समाजबांधवांचा विशाल मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात आदिवासी बांधवांसह महिला भगिनी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील दोधेश्वर नाक्यावर आदिवासींनी ठिय्या आंदोलन सुरू केले. तीन तास सुरू होते. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे पोलिसांनी आदिवासींना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वतः आपल्याशी संपर्क करावा असा पवित्रा आंदोलकांकडून घेण्यात आला, मात्र आमदार बोरसे अधिवेशनासाठी असल्याने येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा परिणाम तणावात झाला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. दगडफेकीत 3 पोलीस जखमी झाले आहेत. सायंकाळी पोलिसांनी रूट मार्च काढीत व्यावसायिकांना व नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी केले. तणावपूर्ण स्थितीमुळे सटाणा शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मणिपूरमधील हिंसाचार आणि आदिवासी महिलांना विवस्त्र करून धिंड काढणाऱया जमावातील सर्व आरोपींना फाशी द्यावी, आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशा प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला.


 

Leave a Comment

और पढ़ें