पाकिस्तान चे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पॅरामिलिट्री रेंजर्सच्या ताफ्याने कॉलर पकडून ओढत नेले.


नवी दिल्ली, वृतसेवा, दिनांक : १० मे २०२३ : पाकिस्तानात अराजक माजले असून माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ( पीटीआय ) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले इम्रान खान आज ०९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर होण्यासाठी आले होते.

मात्र न्यायालयाच्या बाहेरच पॅरामिलिट्री रेंजर्सच्या ताफ्याने कारच्या खिडकीची काच फोडून इम्रान यांची कॉलर पकडली आणि ओढतच व्हॅनमध्ये डांबले. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. रेंजर्सनी इम्रान यांचे वकील, सुरक्षा कर्मचारी आणि समर्थकांनाही चोपले. इम्रान यांनाही मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या पक्षाने केला आहे. दरम्यान, ‘पीटीआय’ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबाद, लाहोर, कराची, रावळपिंडीसह पाकिस्तानात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.

इम्रान खान हे 18 ऑगस्ट 2018 ते 10 एप्रिल 2022 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. पंतप्रधानपदाच्या काळात जमीन घोटाळा आणि कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहेत. नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरो ( एनएबीने ) त्यांच्यावर गुन्हा दाखल करून 1 मे रोजी अटक वॉरंट जारी केले, मात्र आज न्यायालयात हजर होत असतानाच इम्रान यांना ताब्यात घेतल्याने गोंधळ उडाला.

इम्रान खान यांनी सोमवारी लाहोर येथे रॅली घेतली आहे. पाकिस्तान सैन्य आणि गुप्तहेर यंत्रणा आयएसआयवर टीका केली. आयएसआयकडून आपल्याला जीवे मारण्याचा कट असल्याचा आरोप केला. या टीकेनंतर 24 तासांतच इम्रान यांना ताब्यात घेतले. इस्लामाबाद उच्च न्यायालयात बायोमेट्रिक प्रक्रियेसाठी इम्रान खान लाहोरहून आले. न्यायालयाच्या आवारात आधीपासूच पोलीस आणि पॅरामिलिट्री रेंजर्सचा मोठा फौजफाटा तैनात होता. इम्रान यांचा ताफा न्यायालयाच्या आवारात पोहोचण्यापूर्वीच रेंजर्सनी धाव घेतली. इम्रान यांच्या कारच्या खिडकीच्या काचा फोडल्या. कॉलर पकडली आणि ओढतच तुरुंगातील कैद्यांसाठीच्या व्हॅनमध्ये नेऊन डांबले.

यावेळी गोंधळ उडाला. रेंजर्सनी इम्रान समर्थक, त्यांच्या सुरक्षा कर्मचारी आणि वकिलांनाही बेदम मारहाण केली. इम्रान खान यांना मारहाण केली. त्यांना टॉर्चर केले जात असल्याचा आरोप पीटीआय पक्षाच्या नेत्यांनी केला.


 

Leave a Comment

और पढ़ें