मुंबई, वृतसेवा, दिनांक : ०६ मे २०२३ : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसू येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांची भेट घेतली. बारसूच्या रणमैदानावर जाऊन त्यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. रिफायनरीला इथल्या लोकांचा विरोध असेल तर ती इथे येता कामा नये अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी बारसूवासीयांसमोर जाहीर केल्याची केली. सामना या वृत्त पत्राने दिलेल्या माहिती नुसार
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना बारसूच्या जागेचा प्रस्ताव दिल्याच्या पत्रावरून सत्ताधारी मिंधे गट आणि भाजपकडून होत असलेल्या चिखलफेकीचाही त्यांनी समाचार घेतला. हे पत्र दाखवणार असाल तर त्यावेळी मी जे म्हणालो होतो की, ‘जर रिफायनरी येत असेल तर इतल्या लोकांना नेमकं काय आहे ते दाखवा’ हे देखील लोकांना सांगा असं ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘आपण आणखी काही उद्योग महाराष्ट्रात आणत होतो. बल्क ड्रग पार्क, वेदांता फॉक्सकॉन, एअर बस सारखे प्रकल्प कुठे गेले ? माझं मत वेगळं आहे. हा प्रकल्प तुम्ही गुजरातला न्या आणि आमचे चांगले प्रकल्प इथे आणा. म्हणजे जे वादग्रस्त नाहीत ते सगळे प्रकल्प गुजरातला आणि जे वादग्रस्त आहेत ते माझ्या कोकणाच्या माथी मारायचे. म्हणजे राख आम्हाला आणि रांगोळी तुम्हाला… हे चालणार नाही. तुम्ही काळजी करू नका, आपल्या जनतेचे मुडदे पाडून हे सरकार त्याला विकास म्हणणार असेल तर हा विकास मी होऊ देणार नाही.’
आज मी जन की बात ऐकायला आलो आहे. मन की बात करायला आलेलो नाही. तुमचा शिवसेनेवर विश्वास आहे. मी राज्यकर्त्यांना आव्हान देतोय की जसा मी पोलिसांच्या व्यतिरिक्त येऊन मी उभा राहिलो आहे तसे उभे राहा आणि रिफायनरीचे समर्थन करा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.