खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा : विरोधी पक्षनेते अजित पवार


मुंबई, वृतसेवा, दि. २१ एप्रिल :  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच या आधी पत्र पाठवून अजित पवार यांनी या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी केली होती.

दरम्यान, खारघर दुर्घटनेवरुन ठाकरे बंधू आमनेसामने आले आहेत. खारघार दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला होता. त्यामुळे त्याप्रकरणातही आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा का, असा प्रतिसवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

त्यामुळे खारघर दुर्घटनेवरून राजकारण तापू लागले आहे. या घटनेत 50 पेक्षा जास्त जणांचा बळी गेल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्यामुळे शिंदे गटाने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मरिन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने आलेत.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. मृत्यू हा उष्माघातानेच झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आले आहे. यापैकी एका महिलेचा पोस्टमार्टेम रिपोर्ट मिडीयाच्या हाती लागला आहे. या रिपोर्टमध्ये हा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचं नमूद करण्यात आले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें