भंडारा – गोंदिया लोकसभेतील तीन रेल्वेस्थानक अत्याधुनिक होणार


गोंदिया, दिनांक : ०९ डिसेंबर २०२३ : झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत रेल्वेस्थानके अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाची करण्याची घोषणा करण्यात आली. यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील गोंदिया, तुमसर आणि भंडारा रेल्वेस्थानकाचा समावेश असून भविष्यात ही रेल्वेस्थानके अत्याधुनिक सोयींनीयुक्त अशी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. आज या योजनेत समावेश झाला असला तरी या रेल्वेस्थानकांच्या अत्याधुनिक करण्यासंदर्भात खा.सुनील मेंढे यांनी मागील अनेक काळापासून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला आहे.

लहान वाहतूक व्यवस्थांपासून अगदी विमानसेवा सर्वसामान्यांच्या वाट्याला यावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने आता रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा विडा उचलला आहे. गाड्यांची संख्या वाढविणे, वंदे भारत सारख्या सर्व सोयींयुक्त रेल्वेगाड्या प्रवासांच्या सेवेत आणणे. यासोबतच आता रेल्वे स्थानकांची आधुनिकीकरण करण्याचा निर्णय अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून घेतला गेला आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या अनुषंगाने घोषणा केली गेली.

गोंदिया जंक्शन आणि भंडारा रेल्वे स्थानक अत्याधुनिक व्हावे, यासाठी रेल्वेमंत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने पत्रव्यवहार केला. दरम्यान या योजनेत या स्थानकांचा समावेश झाल्यानंतर रेल्वेचे स्टेशन डेव्हलपमेंट विभागाचे कार्यकारी निर्देशक राकेश चौधरी यांचे सोबत रेल भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली. योजनेचे समाविष्ट झालेल्या रेल्वेस्थानकांच्या सुसज्य इमारतीसह सर्व अत्याधुनिक सुविधा रेल्वेस्थानकांवर पुरविण्याच्या दृष्टीने या योजनेच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. दरम्यान खा.सुनील मेंढे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून भंडारा, तुमसर व गोंदिया या रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल आभार मानले आहेत.

गोंदिया रेल्वेस्थानक भारताच्या मध्यरेल्वेच्या मुख्य स्थानकांपैकी एक आहे. सात फलाट असलेले हे स्थानक मुंबई हावडा मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक असून जवळपास दहा हजार प्रवासी रोज प्रवास करतात. या स्थानकावरून 18 लाखाच्या आसपास उत्पन्न नित्याने मिळते. या स्थानकाचे आधुनिकीकरण करून ते जागतिक दर्जाचे स्टेशन होईल या यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. गोंदिया आणि भंडारा हे दोन्ही जिल्हा मुख्यालय आहेत त्यामुळे दर्जेदार रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेत यावे. तसेच तुमसर रेल्वे स्थानकाचाही सर्व स्तरीय विकास व्हावा व तीनही रेल्वे स्थानकांच्या विकासासंदर्भात आराखडा तयार करून लवकरात लवकर काम सुरू व्हावे व प्रवाशांच्या सेवेत विश्वस्तरीय दर्जाचे चांगले स्थानक उभे रहावे अशी अपेक्षा खासदार सुनिल मेंढे यांनी व्यक्त केली.


 

Leave a Comment