शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कीमध्ये भीतीचे वातावरण


नवी दिल्ली, दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२३ : तुर्कस्तानच्या दक्षिणेला सीरियाच्या सीमेला लागून असलेल्या भागात भूकंपाचा अत्यंत जोरदार धक्का जाणवला आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या २६ किमी पूर्वेला असणाऱ्या गाझियानटेपजवळच्या नुरदा येथे होता. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर खाली होता. या अत्यंत शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान या भूकंपामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. गाझियानटेपची लोकसंख्या सुमारे दोन दशलक्ष एवढी आहे, त्यापैकी येथे अर्धा दशलक्ष सीरियन निर्वासित आहेत. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यातही तुर्की-इराण सीमेवर भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता ५.९ रिश्टर स्केल इतकी होती. गेल्या आठवड्यात, तुर्कीच्या सीमेजवळ वायव्य इराणमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यात दोन लोक ठार आणि १२ जण जखमी झाले होते.


 

Leave a Comment