जिल्हा परिषद हायस्कूलची क्षेत्रभेट; वनस्पती सह नदी नाल्यांची दिली माहिती.


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : २३ जानेवारी २०२३ : सौन्दड येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक उपक्रमांतर्गत क्षेत्रभेट, सहल परिसरातील पिपरीघाट येथील कपिलमुनी व शिवमंदिर परिसरात नुकतीचआयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने विद्यार्थ्यांना परिसरातील अनेक वृक्षांची माहिती व ओळख करुन देण्यात आली. तसेच ‘चला जाणूया नदीला’ या अभियाना अंतर्गत चूलबंध नदीची माहिती देण्यात आली. नदीपात्रात आढळणारी रेती, नदीचा प्रवाह, नदी काठावरील शेती, शेतात घेतली जाणारी पिके या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

यानंतर विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये मराठी-हिंदी गाण्यांच्या भेंड्या तसेच मनसोक्तपणे गीतांवर नृत्य देखील सादर करण्यात आली. शेवटी सहभोजनाचा आनंद घेण्यात आला. सदर क्षेत्रभेट व सहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सुनील भीमटे व भूगोल व पर्यावरण शिक्षक अनिल बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात शिक्षक अनिल कापगते, लोकेश रहांगडाले, स्वदीप रामटेके, डॉ मुकेश मेंढे, दमयंती तुरकर, प्रीती टेम्भुर्णीकर, हिना बोरकर, अश्विनी डोंगरवार, तेजस्वीनी मारवाडे, मोहन कोहळे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सुनील भीमटे – मुख्याध्यापक : एखाद्या ठिकाणास भेट देऊन तेथील भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती मिळविणे म्हणजे क्षेत्रभेट होय. क्षेत्रभेट ही प्रात्यक्षिक भूगोल अभ्यास पध्दतीआहे, त्यामुळे क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. 

अनिल बोरकर -भूगोल व पर्यावरण शिक्षक : क्षेत्रभेटी द्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा आणि घडणाऱ्या प्रक्रियांचा प्रत्येक्ष अनुभव घेता येतो. तसेच पर्यावरण, मानवी जीवन, वनस्पती व प्राणी यांचा सहसंबंध जाणून घेता येतो. क्षेत्रभेटी द्वारे त्या क्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो.


 

Leave a Comment