घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा


गोंदिया, दिनांक : २४ डिसेंबर २०२२ : २०१७ मध्ये शास्त्री वार्ड गोंदिया येथील रहिवासी महिला फिर्यादी यांचे राहते घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागीने व एलईडी टि.व्ही., मोबाईल असा एकुण कि. ५८०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्र. २७१/२०१७ कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद होता.

तसेच विवेकानंद कॉलोनी मामा चौक, गोंदिया येथील रहिवासी फिर्यादी नामे- श्री. सतिश गणपतराव राऊत वय ६५ वर्षे रा. यांचे राहते घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागीने, कॅमेरा, सॅमसंग कंपनीचा टॅब, आर्टिफिशीईयल ज्वेलरी व नगदी असा एकूण ३,१४,०००/- रु. चा मुद्देमाल चोरून नेल्याने पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्र. ३५०/२०१७ कलम ४५७, ३८०, ३४ भादंवि अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद होता.

दोन्ही गुन्हयाचे तपासा दरम्यान घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार, आरोपी नामे- विक्की राधेश्याम सुर्यवंशी वय २९ वर्षे रा. गौतम नगर गोंदिया यास दोन्ही गुन्ह्यात अटक करण्यात आले. आणि दोन्हीं गुन्ह्याचे तपासा अंती मा. न्यायालय गोंदिया येथे आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. तसेच फौजदारी खटला क्रं. ४५६/ २०१७ आणि खटला क्रं.६७ / २०१८ अन्वये चालविण्यात आले.

सदर दोन्ही खटल्याचे सुनावणीत आरोपी नामे – विक्की राधेश्याम सुर्यवंशी वय २९ वर्षे रा. गौतमनगर, गोंदिया यांचे विरूध्द साक्षपुराव्यावरून दोषसिध्द झाल्याने मा. मुख्य न्यायदंडाधिकारी मा. श्री. अभिजीत कुलकर्णी, न्यायालय गोंदिया यांनी दिनांक २२/१२/२०२२ रोजी गुरूवारी खटला क्रं. ४५६ / २०१७ मध्ये ५ वर्ष सश्रम कारावास आणि १०००/- रू. द्रव्यदंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास १ महिना अतिरीक्त कारावासाची शिक्षा व खटला क्रं. ६७/२०१८ यामध्ये ५ वर्ष सश्रम कारावास आणि १०००/- रू. द्रव्यदंडाची शिक्षा व दंड न भरल्यास अतिरीक्त १ महिन्याची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी नामे- विक्की राधेश्याम सुर्यवंशी वय २९ वर्षे रा. गौतम नगर, गोंदिया हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असुन वरील प्रमाणे शिक्षा झालेल्या दोन्ही गुन्हयांचा तपास अनुक्रमे सहा. पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर, पो. हवा. मधुकर कृपाण यांनी केलेला आहे. तर दोन्ही खटल्याचे युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता सुरेश रामटेके यांनी केले असुन पोलीस अंमलदार पो. हवा. ओमराज जामकाटे, पोशि किरसान यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले आहे. उत्कृष्ट तपासाबाबत निखील पिंगळे पोलीस अधिक्षक, अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक, सुनिल ताजणे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे नमूद गुन्ह्याचे तपासी अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.


 

Leave a Comment