ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने निधन


मुंबई, वृतसेवा, दिनांक : २६ नोहेंबर २०२२ : रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.

विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तर सहा वाजता च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर वर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (पूर्वाश्रमीच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या १९१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ चित्रपटात दुर्गाबाई यांनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.

ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा तीनही माध्यमांतून गोखले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, घशाच्या त्रासामुळे २०१६ मध्ये त्यांनी नाटकातील अभिनयातून संन्यास घेतला होता.

नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे अध्यापन कार्य गोखले सध्या करीत होते. अभिनय क्षेत्रात हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचे घर असावे या उद्देशातून विक्रम गोखले यांनी स्वत:ची जागा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला देऊन दातृत्वाचा मानदंड प्रस्थापित केला. क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी होते.


 

Leave a Comment