इडीला सापडलं मोठं घबाड 47.76 कोटी रुपयाचे सोने आणि चांदी जप्त.


मुंबई, 14 सप्टेंबर 2022 : इडीने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या परिसरात इडीला मोठं घबाड सापडलं आहे, यामध्ये 91.5 किलो सोनं आणि 340 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात चौकशी सुरू आहे, त्याच्या तपासादरम्यान इडीला मागच्या आठवड्यात हे घबाड सापडलं आहे.

इडीला शोध कारवाईदरम्यान मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. या लॉकरची झडती घेतली असता योग्य नियम न पाळता लॉकर चालवले जात असल्याचं इडीला आढळून आलं. कोणतेही केवायसी न पाळता तसंच लॉकरच्या आवारात सीसीटीव्ही नसल्याचं, कोणतंही रजिस्टर नसल्याचं इडीला आढळून आलं आहे.

इडीने लॉकरची झडती घेतली असता त्यांना इकडे 761 लॉकर्स आढळून आले, यातली 3 लॉकर्स मेसर्स रक्षा बुलियनचे होते. लॉकर्स चालवताना 2 लॉकरमध्ये 91.5 किलो सोनं आणि 152 किलो चांदी सापडली. याशिवाय मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारातून अतिरिक्त 188 किलो चांदीही सापडली आहे. हे सगळं सोनं-चांदी इडीने जप्त केलं आहे. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 47.76 कोटी एवढी आहे.

इडीने मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या 4 परिसरांमध्ये शोध मोहिम पूर्ण केली. मेशर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीच्या संदर्भात शोध घेण्यात आला. त्याआधी इडीने 8 मार्च 2018 ला पीएमएलए 2002 च्या तरतुदींनुसार मेसर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेडविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती. या कंपनीवर बँकांना फसवून 2,296.58 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप आहे.

कर्जाच्या माध्यमातून मिळालेले पैसे वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून पळवून नेण्यात आले. असुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीच्या संदर्भात पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवले गेले. या प्रकरणामध्ये कर्ज घेण्याचा हाच उद्देश नव्हता आणि अशा व्यवहारांसाठी कोणताही करार करण्यात आला नाही, असा इडीचा दावा आहे. याआधी इडीने 2019 मध्ये एकदा 46.97 कोटी आणि 158.26 कोटी या प्रकरणात संलग्न केले होते.


 

Leave a Comment