सडक/अर्जुनी, गोंदिया, दिनांक – ०७ जुलै २०२२ – तालुक्यातील कोसमतोंडी येथील मोरेश्वर ग्यानीराम खोब्रागडे यांचे दोन शेळ्या पहाटे बिबट्याने फस्त केल्या. नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाला लागून कोसमतोंडी गाव असून या परिसरात नेहमी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यातच ०६ जुलै रोजी पहाटे बिबट्याने गोठ्यातील दोन शेळ्या मारल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी येऊन बिबट्याने मारलेल्या दोन शेळ्यांची तपासणी व पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी कागदपत्रे तयार करून वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगण्यात आले.