सौंदड, सडक/अर्जुनी, गोंदिया, ( भामा चुर्हे ) दि. 03 जुलै 2022 : तालुक्यातील अनेक गावांत पांदन रस्त्या अभावी शेतकऱ्यांना व नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. एकीकडे शासन पांदन रस्त्यावर विशेष लक्ष देत आहे. पण सडक अर्जुनी तालुक्यातील पांदन रस्त्याची निर्मिती व त्यांची देखभाल दुरुस्ती यासाठी पंचायत समिती ठेंगा दाखवत आहे.
तालुक्यातील दक्षिण दिशेला राका ग्रामपंचायत अंतर्गत पिपरी हे गाव चुलबंद नदीच्या काठावर असून पिपरीवरून गोंडऊमरी जाणारा सदर पांदन रस्ता दोन्ही जिल्ह्यांचे सिमेवर असल्याने पिंपरी वरून ३ किमी. गोंडऊमरी नाल्यापर्यंत व अर्ध्यातून परसोडी नदी पर्यंत जात असून या तीन किमी. रस्त्याचे दोन्ही बाजूला शेकडो हेक्टर शेतजमीन आहे.
सदर शेतजमीन सौंदड तलाठी साजा मध्ये येते. शेतजमीन जवळपास असलेल्या गावाच्या शेतकऱ्यांची असून त्यांना सौंदड तलाठी कार्यालयात ६ किमी. यावे लागते. निलज, गोंडऊमरी, पिपरी, राका, पळसगाव (सोनका) या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी असल्याने येण्या- जाण्या साठी रस्त्याची महसूल दप्तरी नोंद सुद्धा आहे.
परंतू मागिल २० वर्षांपासून या पांदन रस्त्यावर माती काम करण्यात आले नाही. मागिल २० वर्षात अनेक पंचायत समिती सभापती झाले. पण या पांदन रस्त्याचे कामासाठी अनेकदा शेतकऱ्यांनी मागणी केली परंतु याकडे कोणत्याही पं.स. सभापती व पं.स. सदस्यांनी लक्ष दिले नाही.
वास्तविक राका ग्रामपंचायत चिखली जि.प. क्षेत्रात येत असून भाजपाचे पंतप्रधानपदाचे.स. सभापती २०१० ते २०१५ मध्ये कविता रंगारी (कोहमारा) या होत्या. आणि २०१५ ते २०२० भाजपाच्या जि.प. सदस्य माधुरी पातोडे (राका) यांनी प्रतिनिधित्व केले. २०२२ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या कविता रंगारी विजयी झाल्या.
परंतू या पांदन रस्त्याचे काम झाले नाही. अशी तालुक्यात अनेक गावांत समस्या आहे. खोबा, कोकणा, कनेरी, मनेरी, राका, पळसगाव, सौंदड, परसोडी, कोसमतोंडी, बेहळीटोला, मुरपार शेतात जाणारा मार्ग, लेंडेझरी, धानोरी ते मुंडीपार(ई), मुंडीपार ते टेमणी, सौंदड ते बोपाबोडी (लाल गोडाऊन रेल्वे), रेल्वे ते सिंदीपार अशा अनेक गावांच्या पांदन रस्त्याचे बांधकाम केले गेले नाही.
यात ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी पांदन रस्त्याचे कामाकडे टाळाटाळ करतांनी दिसतात. त्यामुळे पांदन रस्ते शेतशिवारात फक्त कागदावरच दिसून येत आहेत. एकीकडे शेतात जाण्यासाठी काही गावात रोहयो अंतर्गत माती टाकण्याचे काम झाले. पण अनेक रस्त्यांवर मुरूम व खडीकरण झाले नाही. काही रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत झाले आहेत. हे रस्ते पायवाट म्हणून वापरले जात आहेत. या रस्त्याने ये -जा करतांना दमछाक करावी लागत आहे. आतातरी याकडे सदस्यांचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष जाईल का? अशी जनतेची आशा आहे.