मुंबई, साताऱ्यातील जेलची हवा खालल्यानंतर सदावर्ते यांना अकोला पोलिसांकडून अटक होणार!!


अकोला, वृत्तसेवा, 18 एप्रिल : एसटी कर्मचाऱ्यांची कोर्टात भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यामुळे त्यांना साताऱ्यात सलग चार दिवस पोलीस कोठडीत राहावं लागलं. त्याआधी सदावर्ते यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या हल्ल्या प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांना चिथावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी मुंबईतील किला कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सगळ्या घडामोडी घडत असताना राज्यातील इतर वेगवेगळ्या शहरांमध्येही सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मुंबई आणि साताऱ्यातील जेलची हवा खालल्यानंतर सदावर्ते यांना आता अकोला पोलिसांकडून अटक केली जाणार आहे. विशेष म्हणजे अकोल्याचे प्रकरण हे एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचं आहे. त्यामुळे हे प्रकरण सदावर्तेंच्या अडचणी वाढवू शकतं.

अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अकोट न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असून अकोट न्यायालयाने सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी अकोट पोलिसांना परवानगी दिली आहे. या संदर्भात उद्या मंगळवारी अधिकृत आदेश निघणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडणींध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


 

Leave a Comment