पत्रकारांना अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करा


  • प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मागणी…

यवतमाळ, दिनांक 03 जानेवारी 2022 : पत्रकारांना अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, उमरखेडच्या वतीने बिटरगाव पोलीस ठाणेकडे मागणी करण्यात आली आहे. पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ, समाजात घडणाऱ्या अन्याया विषयी आवाज उठवणारे एक सक्षम असे माध्यम. मात्र या चौथ्या स्तंभाला मलिन करण्याची वृत्ती काही व्यक्तीमध्ये असून, त्यामुळे पत्रकारांचा अवमान होत आहे.

तालुक्यातील निंगणुर येथील खालीक अली नवाब या व्यक्तीने व्हाट्सअपच्या माध्यमातून पत्रकारांचे चारित्र्यहनन केले आहे. व त्यांच्या प्रतिमेला तडा दिला असून, निंगनूर येथील इंडियन टायगर ग्रुप या सामाजिक माध्यमात “पत्रकार काहीही करू शकत नाही, पत्रकारांमुळे चिमणी सुद्धा उडत नाही.” अशा शब्दात पोस्ट टाकून समस्त पत्रकारांचा अवमान केला आहे.

या घटनेचा निषेध करण्यासाठी व सदर व्यक्तीवर कडक कारवाईच्या मागणीसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेडच्या वतीने आज बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना निवेदन सादर करून, सदर व्यक्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, मैनोदीन सौदागर, गजानन गंजेवाड , उदय पुंडे, मारुती गव्हाळे, गजानन नावडे, मोहन कळमकर, कमलाकर दुलेवाड, वसंता नरवाडे संघटनेचे आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.


 

Leave a Comment