पाच आरोपी अटक, सोने चोरणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात.


गोंदिया, अर्जुनी मोरगाव, दिनांक – 16 सप्टेंबर 2021 – देवाच्या श्रद्धेचे आमीष दाखवून अर्जुनी येथील महिला व्यापाऱ्याचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या पाच आरोपींना अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अटक केली. अटक झालेली ही टोळी आंतरराज्यीय आहे. टोळीतील पाचही आरोपींना मध्यप्रदेशच्या पांढुरणा येथून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक दिवाणी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

स्थानिक ओजस जनरल स्टोअर्स मध्ये आरोपींनी ३ सप्टेंबर रोजी हातचलाखी करून महिला व्यापाऱ्याचे मंगळसूत्र लंपास केले होते. अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश जाधव आणि चमूने लगेच हरकत घेऊन चोरट्यांच्या तपास सुरू केला. पोलिसांनी मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिली होती. पोलीस विभागाच्या समाज माध्यमांवर संदेश देण्यात आले होते.

सीसीटीव्ही तपासण्यात आले. याची माहिती पांढुर्णा पोलिसांना मिळाली. त्यांनी पाच आरोपींना अटक केली. यात टोळीप्रमुख वसीम सिराज अब्बास (३७) रा. आंबिवली कल्याण ठाणे, माशाअल्ला नव्वर अली (३२) रा टिटीनगर जि. शहडोल मप्र, मुक्तारअली पिल्लू अली (३८) ,जितेंद्र गोकुलप्रसाद रॉय (३०), गंगाराम नगराम नरबरेय्या (४५) तिघेही रा भोपाल यांचा समावेश आहे. यांना मंगळवारी अर्जुनी मोरगाव येथे आणण्यात आले.

विविध ठिकाणी केल्या चोऱ्या


३ सप्टेंबरला सकाळी बालाघाट येथून चार तोळे सोने चोरी करून आले, दुपारी अर्जुनी मोरगाव येथे महिलेचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले, ४ सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सव्वा लाखांवर डल्ला मारला, त्याच रात्री वणी यवतमाळ येथे सव्वा लाखांची चोरी केली, वणी मार्गे नागपूर व त्यांनतर पांढुर्णा कडे पलायन केले, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सतीश जाधव, सपोनि सोमनाथ कदम, हवालदार आनंदराव इस्कापे, नायक बेहरे, विजय कोटांगले, शिपाई गौरीशंकर कोरे, श्रीकांत मेश्राम, पंकज शिवरकर, कुहीकर, लोकेश कोसरे, प्रशांत बागडे व राहुल चीचमलकर यांनी केली.

अशी होती चोरीची पद्धत


सर्वप्रथम ते रेखी करायचे, त्यांना गाव, शहरांची नावे माहिती नसायचे, मोठे गाव, शहर दिसले की बाजारपेठ गाठायची, चोरीची मोहीम फत्ते होईल असे सुरक्षित स्थळ शोधायचे, सावजाचा शोध घ्यायचा, तिथे टोळीप्रमुख यायचा, आम्हाला दान करायचा शौक आहे असे सांगत पूजा अर्चा ठेवायची व स्वतःकडील एक हजार रुपये काढून पूजेत ठेवायचे व हे दान माझ्या तर्फे तुम्ही करा अशी बतावणी करायचे, हजार रुपयांच्या लालसेपोटी कुणीही सहज तयार व्हायचे याचा लाभ ते घ्यायचे, पूजेवर सोन्याचे दागिने ठेवायला सांगत हातचलाखी करून सोन्याचे दागिने लंपास करायचे, जातांना ही पूजा अर्धा तास उचलू नका असे सांगत पलायन करायचे.

पोलिसांची दिशाभूल करायचे.


चोरी केल्यानंतर दुचाकीने जायचे, ठरलेल्या मार्गावर काही अंतरावर चारचाकी वाहन उभे असायचे, दुचाकीवरून उतरून वाहनात बसायचे, वाहनात कपडे बदलून काही अंतरापर्यंत गेल्यानंतर परत दुचाकीने प्रवास करायचा व वेगवेगळ्या मार्गाने पलायन करायचे, लांब पल्ला गाठल्यावर भ्रमणध्वनीद्वारे एकमेकांशी संपर्क करून एकत्र यायचे, यापद्धतीने पोलिसांची तपासाची दिशा मंदावण्यासाठी शक्कल लढवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचे.


 

Leave a Comment