भंडारा, दि, 16 – ऑगस्ट – शेती, आरोग्य, शिक्षण व रोजगार हे विषय महाविकास आघाडी सरकारच्या प्राधान्याचे असून भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका अद्याप टळला नाही. आरोग्य क्षेत्रातील तज्ञ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता भंडारा जिल्हा प्रशासनाने आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर दिला असून जिल्हावासीयांनी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समरोहप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित स्वतंत्र दिनाच्या मुख्य समारोहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपवरसंरक्षक एस.बी. भलावी, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. सोबतच 75 खाटांचे रुग्णालय असणार आहे. आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून 34.24 कोटी रुपयांची तरतुदही करण्यात आल्याचे सांगितले.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला आहे. सामान्य रुग्णालय येथे पेडियाट्रीक वार्ड तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कोरोनावर सध्यातरी ‘लस’ हे एकमेव औषध असून नागरिकांनी लस अवश्य घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्जात असलेल्या जिल्ह्यातील 31 हजार 149 शेतकऱ्यांना 153.52 कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमुक्ती पासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी सुरू केलेल्या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्यातील 10 हजार 384 कुटुंब पात्र ठरली आहे. लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप सुरू आहे.
जिल्हा खनिज प्रतिष्ठान मधील निधीतून विविध विकास कामांना गती दिली जाते यावर्षी 14 कोटी 47 लाख निधी प्राप्त असून यापैकी 4 कोटी 34 लाख निधी कोरोना संसर्गाशी लढा देण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या निधीमधून आरोग्य सुविधा अद्ययावत केल्या जाणार आहेत.
खरीप हंगाम 2020-21 मध्ये किमान आधारभूत धान खरेदी अंतर्गत जिल्ह्यात 37 लाख 51 हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदीपोटी 1 लाख 27 हजार 624 शेतकऱ्यांना 700 कोटी 70 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले तर 256 कोटी 39 लाख रुपये बोनस वितरीत करण्यात आला. रब्बी हंगामासाठी 43 हजार 358 शेतकऱ्यांकडून 18 लाख 39 हजार क्विंटल धान खरेदी केले असून 85 कोटी 49 लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम निधी प्राप्त होताच वाटप करण्यात येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजुरांना विहित मुदतीत मजुरी वाटप करण्यामध्ये व नोंदणीकृत मजुरांचे आधारकार्ड नरेगाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यामध्ये भंडारा जिल्हा राज्यात प्रथम आहे. यासाठी त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.
मत्स्यव्यवसाय शेतीपूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादनासोबतच मत्स्यव्यवसायाची पुरक व्यवसाय म्हणून निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे मच्छिमारांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई पोटी 303 बाधितांना 1 कोटी 18 लाख वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सी.सी.टी.एन.एस. प्रणाली राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या प्रणालीच्या आधारे भंडारा पोलीस विभागाने उत्तम काम करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे. या कामगिरीसाठी त्यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले.
भंडारा जिल्ह्यात निसर्ग पर्यटनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून पर्यटक मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य स्थळांना भेटी देत आहेत. यामध्ये रावणवाडी जलाशय, चांदपूर, गोसेखुर्द धरण, कोका वन्यजीव अभयारण्य, गायमुख, सिंदपूरी बौध्द स्तूप अशा अनेक निसर्ग पर्यटनाचा समावेश आहे. या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शासन कटिबध्द आहे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पोहचविण्याची मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात आली असून या अंतर्गत जिल्ह्यातील 964 शेतकरी गटांमार्फत 6 हजार 311 शेतकऱ्यांना 1 हजार 730 क्विंटल बी- बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 906 गटांमार्फत 4 हजार 245 शेतकऱ्यांच्या बांधावर 1 हजार 293 मेट्रीक टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.
ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी झाला असून मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे हस्ते या प्रकल्पाचा नुकताच शुभारंभ झाला आहे. ई-पीक पाहणीमुळे पिकांच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प शेतकरी बांधवांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त करतो.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन स्मिता गालफडे व मुकुंद ठवकर यांनी केले.